करोडीत ‘टेस्ट ट्रॅक’
By Admin | Published: September 12, 2016 11:17 PM2016-09-12T23:17:44+5:302016-09-12T23:24:17+5:30
औरंगाबाद : आरटीओ कार्यालयासाठी शहराजवळील करोडी येथे देण्यात आलेल्या जागेत ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार करण्यासाठी अखेर प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
औरंगाबाद : आरटीओ कार्यालयासाठी शहराजवळील करोडी येथे देण्यात आलेल्या जागेत ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार करण्यासाठी अखेर प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. हा ट्रॅक तयार करण्यासाठी २६.३२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच या ठिकाणी ट्रॅक तयार होईल आणि अवजड वाहनांच्या चाचणीसाठी शेंद्रा एमआयडीसी ये-जा करताना वाहनधारकांची होणारी गैरसोय थांबणार आहे.
कार्यालयात दररोज येणारी वाहने आणि कारवाईमध्ये जप्त केलेली वाहने उभी करण्यासाठी येथील जागा अपुरी पडते. काही दिवसांपूर्वीच शहराजवळील करोडी येथील ११ एकर जमीन देण्यात आली. जड वाहनांची पासिंग आणि ब्रेक तपासणीसाठी शेंद्रा एमआयडीसी परिसराच्या रस्त्यावर काम सुरू करण्यात आले. परंतु हे अंतर अधिक लांब पडते.
करोडी येथील जागेत हा ट्रॅक तयार करण्यासाठी मंजुरीची प्रतीक्षा केली जात होती. अखेर त्यास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. आरटीओ कार्यालयाची सध्याची इमारत अत्यंत जुनी झाली आहे. पावसाळ्यात ठिकठिकाणी गळती लागत असल्याने कागदपत्रे भिजतात. स्वच्छतागृह, पार्किंग व्यवस्थाही नाही. त्यामुळे आता नव्या जागेत अद्ययावत इमारत उभारण्यास मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा केली जात आहे.