दारूविक्रेत्याची क्रूरता,१०० रुपये चोरीच्या संशयातून युवकाचा खून; कचऱ्यात फेकला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 03:01 PM2022-03-11T15:01:56+5:302022-03-11T15:05:02+5:30
कारगिल मैदानाजवळच्या कचऱ्यात एक मृतदेह पडून असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना फोनवरून मिळाली होती.
औरंगाबाद : दारूच्या अवैध अड्ड्यावर काम करणाऱ्या १८ वर्षांच्या युवकाचा १०० रुपये चोरल्याच्या संशयावरून तीन वेळा मारहाण करीत खून केल्याची घटना आनंदनगर येथे बुधवारी रात्री घडली. युवकाचा मारहाणीत मृत्यू झाल्यामुळे आरोपीने दुचाकीवर मृतदेह ठेवून कारगिल मैदानाजवळील कचऱ्यात पहाटे फेकला. पुंडलिकनगर पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
शेख अश्फाक ऊर्फ मुक्या शेख अब्दुल (१८, रा. बंबाटनगर) असे मृताचे नाव आहे. शेख मुबारक ऊर्फ बाबा शेख हैदर (३८, रा. आनंदनगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. कारगिल मैदानाजवळच्या कचऱ्यात एक मृतदेह पडून असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना फोनवरून मिळाली. तेव्हा पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त विशाल ढुमे, निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्यासह गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी गेले. मारहाणीच्या व्रणावरून खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर विभक्त राहणाऱ्या त्याच्या आईवडिलांना शोधून काढले. तेव्हा घटनेचा उलगडा झाला. मृत मुक्या हा बाबा याच्या अवैध दारूअड्ड्यावर मागील सहा वर्षांपासून कामाला असल्याचे त्यांच्या वडिलांनी सांगितले. त्यानुसार बाबा यास ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवून विचारपूस केल्यानंतर मुक्याचा मृत्यू मारहाणीत झाल्याचे मान्य केले. मुक्या हा सतत पैसे चोरत असल्याचा संशय बाबाला होता. यापूर्वीही त्याने पैसे चोरल्याच्या संशयावरून त्यास मारहाण केली होती. १०० रु. चोरल्याच्या संशयावरून बुधवारी दुपारी, सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी बाबाने मारहाण केली. रात्री लाकडी दांड्याने केलेल्या मारहाणीत एक घाव वर्मी लागल्यामुळे मुक्या जागीच गतप्राण झाला. बाबाने दुचाकीवरून त्याचा मृतदेह कचऱ्यात आणून टाकल्याची कबुली दिल्याचे पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले.
२७ हजार रुपयांची मागणी
मृत मुक्या याच्याकडे बाबाचे २७ हजार रुपये देणे होतेे. ते देण्याची मागणी बाबा त्याच्या वडिलांकडे करीत होता. पैसे देऊ शकत नसल्यामुळे मुक्याला दारूच्या अड्ड्यावर काम करण्यास लावत होता. त्यातूनच ही हत्या करण्यात आल्याचा आरोप मृताच्या वडिलांनी केला आहे.
मुलांच्या मैत्रीतून ओढले दारूविक्रीत
मुक्याचे आईवडील कामगार असल्यामुळे ते बाहेर असत. मुक्याची बाबाच्या मुलांशी मैत्री होती. त्यातून बाबा याने मुक्याला अवैध दारूविक्रीच्या धंद्यात ओढल्याची माहिती मृताच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. शवविच्छेदनानंतर मृत्यू नेमका कशातून झाला, हे स्पष्ट होणार आहे.
...पुन्हा पुंडलिकनगर चर्चेत
मागील काही दिवसांपासून पुंडलिकनगर पोलीस ठाणे विविध घटनांमुळे चर्चेत येत आहे. एमपीडीएअंतर्गत कारागृहात असलेला कुख्यात गुंड टिप्या, खुनाच्या घटनेत कारागृहात असलेली तनपुरे गँग, नुकतीच प्रकाशझोतात आलेली दुर्लभ कश्यप गँगच्या कारवायांमुळे पुंडलिकनगर चर्चेत आलेले आहे. अवैध दारूविक्री, दादा होण्याच्या ईर्ष्येतून गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.