सीएसएमआरडीए दलालांच्या विळख्यात? एजंट संचिका दाखल करणाऱ्याशी करतात संपर्क
By विकास राऊत | Published: December 5, 2023 03:09 PM2023-12-05T15:09:00+5:302023-12-05T15:10:01+5:30
मोठ्या ले-आउट मंजुरीच्या संचिका असल्यास काही दलाल संबंधितांना संपर्क करून मागणी करीत आहेत.
छत्रपती संभाजीनगर : सीएसएमआरडीए (छत्रपती संभाजीनगर मेट्रोपॉलिटियन रिजनल डेव्हलपमेंट ॲथॉरिटी) मध्ये बांधकाम परवानगी व एनएच्या अनुषंगाने दाखल झालेल्या संचिका मंजुरीसाठी एकरी ३० हजार रुपये दर आकारण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. संचिका दलालांच्या विळख्यात अडकत असून, यासाठी संबंधित एजंट संचिका दाखल करणाऱ्यांशी संपर्क करीत असल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. ही रक्कम कोण जमा करीत आहे आणि दलालांना अभय कुणाचे आहे यावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे.
मोठ्या ले-आउट मंजुरीच्या संचिका असल्यास काही दलाल संबंधितांना संपर्क करून मागणी करीत आहेत. हा सगळा प्रकार अद्याप विभागीय आयुक्त तथा प्राधिकरणाचे प्रभारी आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्या कानावर गेलेला नसावा, त्यामुळे दलालांना अभय मिळत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी संचिका दाखल केल्यानंतर ती ३० दिवसांत मंजूर झाली नाही, तर डीम्ड (अभिमत) परवानगी म्हणून संबंधित जमीनमालकाला पर्याय असताे; परंतु बीपीएमएसमध्ये संचिका ऑनलाइन अपलोड करताना त्या पर्यायाचा वापर करणे गरजेचे असते.
प्रादेशिक विकास महानगर प्राधिकरणांअंतर्गत ३१३ पैकी अनेक गावांमध्ये देण्यात येणाऱ्या अकृषक (एनए) व बांधकाम परवानग्यांमध्ये यूडीपीसीआरचे (एकत्रिकृत विकास नियंत्रण नियमावली) पालन होत नसल्याच्या त्या तक्रारी तत्कालीन आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. २०१९ च्या जुलै महिन्यातील प्राधिकरणाच्या बैठकीत कार्यकारी समितीचे काही अधिकार आयुक्तांना दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हद्दीतील ३१३ गावांतील अकृषकचे, भोगवटा, बांधकाम परवानगीचे अधिकार प्राधिकरणाकडे आले. प्रभारी आयुक्त म्हणून सध्या विभागीय आयुक्त आर्दड यांच्याकडे पदभार आहे.
कंपाउंडिंग शुल्काचे त्रांगडे...
प्राधिकरणाच्या हद्दीत झालेली बांधकामे नियमित करण्यासाठी कंपाउंडिंग शुल्काचे धोरण सहा महिन्यांपासून ठरत नाही. शासनही याबाबत निर्णय घेण्यास तयार नाही. परिणामी बेलगाम बांधकामांचा सपाटा प्राधिकरणाच्या हद्दीत सुरू आहे. याकडे गांभीर्याने कुणीही पाहण्यास तयार नाही.
आयुक्त काय म्हणाले,
विभागीय आयुक्त आर्दड यांना याप्रकरणी विचारले असता ते म्हणाले, याबाबत माझ्याकडे कुठलीही तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यास निश्चितपणे कारवाई केली जाईल. किंवा काही संचिकांमध्ये त्रुटी असतील व त्या मंजूर होत नसतील, म्हणूनदेखील अशी चुकीची माहिती पेरली जाऊ शकते.