आरोग्य विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवात 'सीएसएमएसएस' दंत महाविद्यालय सर्वोत्कृष्ट
By राम शिनगारे | Published: June 16, 2023 08:18 PM2023-06-16T20:18:07+5:302023-06-16T20:18:36+5:30
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान : आरोग्य विज्ञान विद्यापीठात कार्यक्रम
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवानिमित्त महसूल विभागानुसार 'मराठवाडा सर्वोत्कृष्ट महाविद्यालया'चा पुरस्कार सीएसएमएसएस दंत महाविद्यालयाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. महाविद्यालयातर्फे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख यांनी हा पुरस्कार स्विकारला.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा रौप्यमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त महसूल विभागनिहाय विविध निकषानुसार सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांची निवड करण्यात आली. त्यात मराठवाड्यातून सीएसएमएसएस दंत महाविद्यालयाने बाजी मारली आहे. त्यात 'नॅक' मूल्यांकनावर आधारित पदवी, पदव्युत्तर विद्यार्थी प्रवेश क्षमता, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, वार्षिक निकाल, विद्यार्थी कल्याण विभागामार्फत घेतलेले विविध उपक्रम, पायाभूत व शैक्षणिक सुविधा, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, अभ्यासोत्तर उपक्रम, शिक्षकांची कामगिरी, संशोधन, पेटंटची नोंदणी, आयएसओ मानांकनासह इतर निषकांचा महाविद्यालयाच्या निवडीसाठी विचार करण्यात आला. त्यात दंत महाविद्यालयाने उत्कृष्ट कामगिरी नोंदविल्यामुळे निवड झाली आहे. संस्थेचे सचिव पद्माकरराव मुळे म्हणाले, मराठवाड्यातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार मिळाल्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर शिक्कामोर्तब झाले आहे. आता अधिक जबाबदारी वाढली असून, रुग्ण व विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न असणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थी, प्राध्यापकांची कामगिरी
दंत महाविद्यालयातील विद्यार्थीन डॉ. यशश्री देशमुच हीने विद्यापीठ स्तरावर दोन वेळा सुवर्णपदक पटकावले. त्याशिवाय अस्मिता शिंदे, वर्षाराणी नागरगोजे, गितांजली भोसले, मोसमी सय्यदा या विद्यार्थिनीनी विद्यापीठाच्या क्रमवारीत स्थान पटकावले. सहायोगी प्राध्यापक डॉ. ज्योती मगरे यांनी १०२९ ला पेटंट मिळवले आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रणजीत मुळे, सचिव पद्माकरराव मुळे, विश्वस्त समीर मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख यांनी विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांचे कौतुक केले आहे.