तरुणांचे सीटीस्कॅन, ईसीजी, एक्स-रे मोफत; आरोग्य तपासणी केली का?
By संतोष हिरेमठ | Published: December 19, 2023 04:20 PM2023-12-19T16:20:19+5:302023-12-19T16:20:32+5:30
अभियान : अनेक तरुणांना आजाराचे निदान, शस्त्रक्रियेचीही वेळ
छत्रपती संभाजीनगर : सीटीस्कॅन, ईसीजी, एक्स-रे करायचा म्हटला की, किती पैसे लागेल, असा प्रश्न पडतो. मात्र, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून १८ वर्षांवरील तरुणांच्या विविध तपासण्या अगदी मोफत केल्या जात आहे. त्यातूनच अनेकांना मधुमेह, उच्चरक्तदाब अशा आजारांचेही निदान झाले आणि वेळीच उपचारही सुरू झाले.
‘आयुष्यमान भव’ अभियानात १८ वर्षांवरील तरुणांची मोफत आरोग्य तपासणी केली जात आहे. गेल्या काही वर्षांत तरुणांमध्ये मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग वाढल्याचे दिसते. रुग्णालयात जाईपर्यंत अनेक तरुणांना आपल्याला काही आजार असेल, याची पुसटशीही कल्पना नसते. परंतु मोफत तपासणी केली आणि काहींना उच्चरक्तदाब, तर काहींना मधुमेह तर काहींना इतर आजारांचे निदान झाले. काहींवर शस्त्रक्रियेचीही वेळ ओढावली.
काय आहे ‘निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ अभियान?
राज्यात आरोग्य विभागांतर्गत आयुष्मान भव मोहिमेंतर्गत १७ सप्टेंबरपासून ‘निरोगी आरोग्य तरुणाईचे-वैभव महाराष्ट्राचे’ अभियान राबवण्यात येत आहे. यामध्ये १८ वर्षे व त्यावरील सर्व पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
या तपासण्या होतात मोफत
आरोग्य विभागांतर्गत असलेल्या रुग्णालयांमध्ये १८ वर्षांवरील तरुणांची रक्तदाब, मधुमेह, हर्निया, पोटाचे विकार, एचआयव्ही, तोंडाचा कर्करोग, मनोविकार आदी आजार आणि त्यासाठी आवश्यक रक्त तपासण्या, सीटी स्कॅन, एक्स-रे आदी तपासण्या मोफत केल्या जात आहेत.
कोठे कराल मोफत तपासणी?
आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रापासून, तर जिल्हा रुग्णालयांपर्यंत सर्व ठिकाणी तपासणी केली जात आहे. ज्यांना विविध तपासण्या करण्याची गरज आहे, त्यांना आरोग्य केंद्रातून, उपकेंद्रातून ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा, जिल्हा रुग्णालयात रेफर केले जाते.
जिल्ह्यात नऊ लाख तरुणांची मोफत तपासणी
या अभियानात आतापर्यंत ९ लाख २२ हजार ९७१ जणांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यातील ९ लाख १३ हजार २६३ जणांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अभय धानोरकर यांनी दिली.
एक हजार जणांवर शस्त्रक्रिया
ज्यांना शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, अशांना शासकीय रुग्णालयासह शासकीय योजना लागू असलेल्या खाजगी रुग्णालयात संदर्भित केले जाते. एकट्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आतापर्यंत एक हजार सात जणांना शस्त्रक्रियेची गरज असल्याचे निदान झाले.
जिल्ह्यात चांगली कामगिरी
हे अभियान दि. ३१ डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रापासून ते जिल्हा रुग्णालयांपर्यंत सर्व ठिकाणी मोफत तपासणी केली जात आहे. या अभियानात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने चांगली कामगिरी केली आहे.
-डाॅ. भूषणकुमार रामटेके, आरोग्य उपसंचालक