वडिलोपार्जित कला जोपासली; धुडगूस घालणाऱ्या वानरांना 'तो' अलगद अडकवतो पिंजऱ्यात
By साहेबराव हिवराळे | Published: September 14, 2023 06:25 PM2023-09-14T18:25:28+5:302023-09-14T18:25:45+5:30
आतापर्यंत हजारो माकडे, वानरे सोडले निसर्गाच्या सान्निध्यात
छत्रपती संभाजीनगर : गाव वस्तीत माकडाने धुडगूस घातला तर समाधान गिरी नावाच्या तरबेज व्यक्तीने गेल्या पंचवीस वर्षांत हजारो वानर, माकडांना जवळ बोलावून चणे देत पिंजऱ्यात बंद करून नैसर्गिक वातावरणात मुक्त केले आहे.
सिल्लोड तालुक्यातील अंभई या गावातील समाधान गिरी असे या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या आजोबा, पणजोबांपासून ही कला त्याने जोपासलेली असल्याचे ते सांगतात. मराठवाड्यातच नव्हे, तर विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह सर्वत्र गिरी यांचीच टीम ‘रेस्क्यू’ करण्यास जाते. फळे, अन्न-पाण्याच्या शोधात माकडे, वानरे शहरात येतात. अनेक ठिकाणी वनविभाग देखील गिरी यांनाच पाचारण करतो. शेतकऱ्यांना व शाळा, मंदिर परिसरात भक्तांना वानरांच्या त्रासाबद्दल वनविभागाशी संपर्क साधला जातो, असे वनपरिक्षेत्र अधिकारी दादा तौर यांनी सांगितले.
विदर्भात रेस्क्यूसाठी मराठवाड्यातील टीम दाखल...
सोमवारी गिरी, संदीप गिरी व टीमसह अमरावतीजवळ वरूड या गावी वानराचा बंदोबस्त करण्यासाठी गेले. त्यांच्यामुळे वनविभागाची डोकेदुखी झाली आहे.
कांदा-पाण्याचा पाहुणचार...
शहरात गच्चीवर येऊन हे प्राणी धान्य, कांदे, मिरची खातात व मुलांचा त्रास झाला की, निघून जातात. परंतु, खेड्यात झाडांची संख्या बऱ्यापैकी असल्याने तसेच कांदा-भाकरी, पाणी दिले जाते. पाहुणचार अधिक दिवस चालतो. पण, त्रास झाला की, वनविभागाशी बंदोबस्तासाठी संपर्क साधला जातो. वनविभागाने कळविले की, आम्ही जातो. माकडे, वानरे पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडून देतो.
- समाधान गिरी (वानर रेस्क्यू टीम)