नागसेन फेस्टिव्हलमध्ये सांस्कृतिक मेजवानी;अभिनेते मिलिंद शिंदे ते झुंडमधील रॅपर विपीन येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2022 06:44 PM2022-03-31T18:44:30+5:302022-03-31T18:48:13+5:30
जल्लोषात उद्यापासून रंगणार नागसेन फेस्टिव्हल
औरंगाबाद : पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या वतीने भीमजयंती निमित्त १ ते ३ एप्रिल दरम्यान आयोजित नागसेन फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्यास सिने अभिनेते मिलिंद शिंदे हजेरी लावणार आहेत. तीन दिवसीय फेस्टिव्हलमध्ये कला, साहित्य, संगीत, गायन, विज्ञान, शिक्षण क्षेत्र, अशी सांस्कृतिक मेजवानी असून मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
तिन्ही दिवसांच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य निमंत्रक सचिन निकम, सिद्धार्थ मोकळे, अॅड धनंजय बोर्डे, डॉ.किशोर वाघ, अॅड.हेमंत मोरे, अॅड.अतुल कांबळे, प्रा.प्रबोधन बनसोडे, इंजि.अविनाश कांबळे, गुणरत्न सोनवणे, कुणाल भालेराव, सागर ठाकूर, चिरंजीव मनवर, सम्यक सर्पे, निलेश वाघमारे, विशाल देहाडे, सुशील राऊत, मुकेश घुमारे, किरण शेजवळ, आनंद सूर्यवंशी, प्रेम ढगे, स्वप्नील जगताप, विशाल बचके आदींनी केले आहे.
असे आहेत कार्यक्रम
१ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध चित्रपट अभिनेते मिलिंद शिंदे यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन होणार आहे. यावेळी सुनील गजाकोष यांचे 'काला ते झुंड चित्रपट सृष्टीचे बदलते परिणाम' विषयावर व्याख्यान होईल. लेखक, दिग्दर्शक राजकुमार तांगडे हे या सत्राचे अध्यक्ष असणार आहेत. त्यानंतर सूरज बनकर आणि संचाचे भीमगीतावरील नृत्य सादरीकरण, चित्रकार कैलास खाणजोडे ह्यांचे पेंटींगचे थेट प्रात्यक्षिक, तलवारबाजी लाठीकाठीचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर होईल.
मान्यवरांचे सत्कार
जेष्ठ आंबेडकरवादी कार्यकर्ते श्रावण गायकवाड हे सहकुटुंब तसेच चर्मकार बांधवांना घेऊन बौद्ध धम्म स्वीकारणार असल्याने त्यांचा कुटुंबासह सत्कार करण्यात येणार आहे. निष्ठावान आंबेडकरवादी कार्यकर्ते प्रकाश जाधव, भीमजयंती निमित्त 'रन फॉर इक्वालिटी' चे आयोजन टीम, एशियन बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविणारी सृष्टी सचिन साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे संचालक मंडळ, शिक्षणमहर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानच्या संचालकांचा सामूहिक सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते होईल. पोलीस प्रशासन, आरोग्य, शिक्षण, विधी, कला, चित्रपट ह्या क्षेत्रातील मान्यवरांचा मिलिंद सन्मान देऊन गौरव करण्यात येईल.
२ एप्रिलला गौरव सोमवंशी यांचे व्याख्यान
२ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध ब्लॉक चेन एक्सपर्ट तथा आंबेडकरी चळवळीतील अभ्यासक गौरव सोमवंशी ह्यांचे तंत्रज्ञान क्रांती आणि लोकशाहीचे भवित्व ह्या विषयावर व्याख्यान होईल. तर वैज्ञानिक अधिकारी अमोल झोडपे हे अध्यक्ष असतील. सायंकाळी ७:३० वाजता एल्गार समतेचा अभिनव कवी संमेलन पार पडेल त्यात प्रसिद्ध कवी प्रा. प्रशांत मोरे हे अध्यक्षस्थानी असतील. राकेश शिरके(मुंबई.), नारायण पुरी (औरंगाबाद.), देवानंद पवार (औरंगाबाद), उमा गरड (नांदेड), पोलीस निरीक्षक राजश्री आडे हे कवी सहभागी होतील. ध. सु.जाधव हे सूत्रसंचालन करतील. यावेळी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना मिलिंद सन्मान देऊन गौरविण्यात येईल. यात विद्यापीठातील इतिहास विभागप्रमुख डॉ.पुष्पा गायकवाड, अधिष्ठाता चेतना सोनकांबळे, निवृत्त पोस्ट मास्टर सुशीला खडसे, रमाई च्या संपादक डॉ.रेखा मेश्राम, सहायक पोलिस निरीक्षक वंदना हिवराळे, पोलीस उपनिरीक्षक आरती जाधव, व्ही एन पाटील महाविद्यालयाच्या डॉ.शिल्पाराणी डोंगरे आदींचा सन्मान करण्यात येईल. महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रा.दिलीप महालिंगे (जेष्ठ नाट्यकर्मी), गीत भीमायनचे प्रा.संजय मोहड, शाहीर उत्तम म्हस्के, वुई द पिपलचे प्रा.विजयकुमार गवई, रमाई चित्रपटाच्या निर्मात्या प्रियंका उबाळे, तासिका ह्या लघुपटाचे निर्माते अस्लम बागवान, सिने अभिनेते रुपेश परतवाघ, आंबेडकरवादी रॅपर विपीन तातड, जेष्ठ कलावंत दिलीप जोगदंड, महाकवी वामनदादा कर्डकाच्या मानस सून विमल जाधव यांना जेष्ठ कवी गायक प्रतापसिंग बोदडे यांच्या हस्ते महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
३ एप्रिलला सरफराज अहमद यांचे व्याख्यान
महोत्सवाच्या समारोप ३ एप्रिलला इतिहासकार तथा सल्तनत ए खुदादादचे लेखक सरफराज अहमद ह्यांचे 'इतिहासाचे विकृतीकरण आणि धर्मांधतेचे राजकारण' ह्या विषयावर व्याख्यान होईल. साहित्यिक डॉ.उत्तम अंभोरे हे अध्यक्षस्थानी असतील. यावेळी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माजी विद्यार्थ्यांस देण्यात येणारा प्रतिष्ठेचा 'नागसेन गौरव पुरस्कार' सिद्धार्थ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा जेष्ठ साहित्यीक ज.वि पवार ह्यांना जेष्ठ कवी प्रतापसिंग बोदडे ह्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. शिवाय मिलिंद मल्टिपर्पज हायस्कुलच्या विकासात योगदान देणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार होईल. झुंड चित्रपटाचे रॅप गायक विपीन तातड ह्यांचा रॅप टोली हा संच रॅप सादर करतील. झुंड चित्रपटातील कलावंत प्रवीण डाळिंबकर, अभिनेते अभिमान उन्हवणे, झुंड मधील बाबु , अभिनेत्री तथा नृत्यांगना प्रांजल सुरडकर हिचे भीमगीतावरील नृत्य सादरीकरण, बाल तबला वादक प्रथमेश म्हस्के ह्याचे तबला वादन हे समारोपाच्या कार्यक्रमाचे आकर्षण असेल.