सुसंस्कृत, विकासाभिमुख प्रशासक हरपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:04 AM2021-01-03T04:04:51+5:302021-01-03T04:04:51+5:30
विद्यापीठ : माजी कुलगुरू के.पी. सोनवणे यांना श्रद्धांजली औरंगाबाद : सुसंस्कृत व विकासाभिमुख प्रशासन राबविणारे लोक आजकाल दुर्मीळ होत ...
विद्यापीठ : माजी कुलगुरू के.पी. सोनवणे यांना श्रद्धांजली
औरंगाबाद : सुसंस्कृत व विकासाभिमुख प्रशासन राबविणारे लोक आजकाल दुर्मीळ होत आहेत. अशा काळात के.पी. सोनवणे यांचे जाणे क्लेशदायक असल्याचा सूर श्रद्धांजली सभेत निघाला.
कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील महात्मा फुले सभागृहात माजी कुलगुरू के.पी. सोनवणे यांच्या शोकसभेचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. यावेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेश करपे, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी आदींची मंचावर उपस्थिती होती. कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी के.पी. सोनवणे यांच्या विद्यापीठातील कार्यकाळाबद्दल माहिती दिली. ते २१ डिसेंबर १९९९ ते २० डिसेंबर २००४ या काळात कुलगुरुपदी कार्यरत होते. डॉ. गव्हाणे यांनी के.पी. सोनवणे यांच्या कार्यकाळावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, संत भगवानबाबा यांचे पट्टशिष्य असलेल्या सोनवणे सरांनी शिक्षक ते कुलगुरू, असा मोठा पल्ला गाठला. अत्यंत मितभाषी असलेल्या सोनवणे सरांनी उस्मानाबाद उपपरिसराची स्थापना केल्याचे सांगत आठवणींना उजाळा दिला. कुलगुरू डॉ. येवले यांनी अध्यक्षीय समारोपात विद्यापीठाच्या स्थापनेपासून ८० वर्षांत अनेकांनी योगदान दिले. त्यात अजूनही नावलौकिक मिळविलेल्या कुलगुरूंमध्ये सोनवणे यांचे नाव अग्रगण्य आहे. सोनवणे यांचे योगदान आम्हाला प्रेरणा देत राहील, असे सांगितले. संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास अधिष्ठाता, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
----
फोटो ओळ
माजी कुलगुरू के.पी. सोनवणे यांना शोकसभेत श्रद्धांजली वाहताना कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. राजेश करपे, डॉ. जयश्री सूर्यवंशी आदींसह विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक व कर्मचारी.