उत्सुकता महापौरांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:41 AM2017-10-25T00:41:47+5:302017-10-25T00:41:59+5:30
महापौर व उपमहापौर पदासाठी बुधवारपासून अर्ज करता येणार असून २७ आॅक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. महापौर व उपमहापौर निवडीसाठी १ नोव्हेंबर रोजी विशेष सर्वसाधारण सभा होणार असून पिठासिन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची उपस्थिती राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापौर व उपमहापौर पदासाठी बुधवारपासून अर्ज करता येणार असून २७ आॅक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. महापौर व उपमहापौर निवडीसाठी १ नोव्हेंबर रोजी विशेष सर्वसाधारण सभा होणार असून पिठासिन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची उपस्थिती राहणार आहे. पहिल्यांदाच अनुसूचित जाती प्रवर्गातून मिळणारे महापौर पद कोणाच्या गळ्यात पडेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापौर पदासाठी बुधवारी सकाळी ११ वाजेपासून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तीन दिवस हे अर्ज स्वीकारले जातील. २७ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करता येणार आहेत. नांदेड महापालिकेचे महापौर पद हे अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. पहिल्यांदाच अनुसूचित जाती प्रवर्गासाठी महापौर पद सुटले आहे. नांदेड महापालिकेत काँग्रेसला एकतर्फी बहुमत मिळाले असून ८१ पैकी ७३ जागा काँग्रेसने मिळवल्या आहेत.
शहराचे अकरावे महापौर पदही काँग्रेसकडेच जाणार आहे. काँग्रेसकडून महापौर पदासाठी पूजा पवळे, ज्योती रायबोले, शीला भवरे, दीक्षा धबाले यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे महापौर पद आता नेमके कोणाच्या गळ्यात पडेल हे २७ आॅक्टोबर रोजीच स्पष्ट होणार आहे. उपमहापौर पदासाठीही काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेसकडून महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार हे प्रदेशाध्यक्ष खा. चव्हाण हेच ठरवणार आहेत. त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापौर, उपमहापौर पदासह आता स्थायी समिती सभापती, सभागृह नेता यांच्या नावाची चर्चाही सुरू झाली आहे.