करंसी घोटाळा: २९ तरुणांच्या खात्यात थेट विदेशातून फंडिंग, देशविरोधी कृत्यासाठी वापर

By सुमित डोळे | Published: September 13, 2024 08:02 PM2024-09-13T20:02:03+5:302024-09-13T20:03:18+5:30

फॉरेन कनेक्शनमुळे गुन्ह्याची व्याप्ती वाढणार, शहरातील २९ तरुणांची नावे निष्पन्न

Currency Scam: Direct Foreign Funding in Accounts of 29 Youths, Used for Anti-National Activities | करंसी घोटाळा: २९ तरुणांच्या खात्यात थेट विदेशातून फंडिंग, देशविरोधी कृत्यासाठी वापर

करंसी घोटाळा: २९ तरुणांच्या खात्यात थेट विदेशातून फंडिंग, देशविरोधी कृत्यासाठी वापर

छत्रपती संभाजीनगर : महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुणांच्या नावे बँक खाते उघडून कोट्यवधींच्या बेनामी व्यवहारात थेट विदेशातून फंडिंग होत होती. यात प्रामुख्याने दोन देशांची नावे निष्पन्न झाली असून, विदेशी नेटवर्कमुळे मात्र यंत्रणा अवाक् झाल्या आहेत.

बुधवारी गुप्तचर यंत्रणा, शहर पोलिसांनी नॅशनल करंसीचे रॅकेट उघडकीस आणले. सुरतचा उत्सवकुमार चंदुभाई भेसानिया (वय २३, रा. सुरत, गुजरात) हा शहरातील ऋषिकेश शिवनाथ भागवत (२३, रा. सिंहगड कॉलनी, एन-६) व अनुराग भाऊसाहेब घोडके (२१, रा. म्हसोबानगर, जाधववाडी) यांच्या मदतीने तरुण, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कमिशन देऊन आवश्यक कागदपत्रे घेऊन खाते उघडते होते. यासाठी उत्सवकुमारला ऋषिकेश, अनुराग मदत करत होते. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच दोघांना उत्सवकुमारने रॅकेटशी संबंधित एका टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी केले होते. त्यामुळे दोघेही अल्पावधीत रॅकेटचा महत्त्वपूर्ण भाग झाल्याची दाट शक्यता अधिकाऱ्यांना आहे.

मराठवाडा उत्सवकुमारकडे
मूळ सुरतचा असलेला उत्सवकुमार महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. सहा महिन्यांपासून तो शहरातील काही तरुणांच्या संपर्कात आहे. त्यापूर्वी तो अन्य मुलांकडून काम करवून घेत होता. त्या तरुणांचाही तपास पथक शोध घेत आहे. खातेधारकाला ७ हजार, तर अनुराग व ऋषिकेशला थेट टक्केवारीवर पैसे मिळत हाेते. या रॅकेटसाठी शहरासह संपूर्ण मराठवाड्यातील नेटवर्कची जबाबदारीच मुख्य सूत्रधारांनी उत्सवकुमारकडे दिली होती. गुरुवारपर्यंत शहरातील किमान ३० मुलांची नावे निष्पन्न झाली होती. त्यापैकी दोघांची गुरुवारी रात्रीच कसून चौकशी करून नोटीस बजावून सोडण्यात आले.

बंद खात्यांच्या तपासाचे आव्हान
शहरातील तरुणांचे बँक खात्यांचे पासबुक, एटीएम, डेबिट कार्ड उत्सवकुमार गुजरातला घेऊन जात होता. त्याआधारे कोट्यवधींचे व्यवहार होत होते. ओटीपीसाठी ते त्यांच्याकडील मोबाइल क्रमांक जोडत होते. चार ते पाच व्यवहारानंतर ते खाते बंद करायचे. अशा बंद झालेल्या शेकडो खात्यांचा तपास करणे तपास यंत्रणेला आव्हान आहे. त्या खात्यांमधून मोठे पुरावे हाती लागण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणेला आहे.

विदेशांतून फंडिंग
या संपूर्ण रॅकेटला विदेशातून फंडिंग होत असल्याचे सबळ पुरावे मिळाले आहे. विदेशी संबंधामुळे गुन्ह्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे बेनामी व्यवहारांपेक्षा देशविरोधी कृत्यांसाठीच हे रॅकेट सुरू असल्यावर तपास यंत्रणा ठाम आहेत.

Web Title: Currency Scam: Direct Foreign Funding in Accounts of 29 Youths, Used for Anti-National Activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.