करंसी घोटाळा; रॅकेटमध्ये सहभागी २० पेक्षा अधिक तरुण छत्रपती संभाजीनगरातून फरार
By सुमित डोळे | Published: September 14, 2024 12:52 PM2024-09-14T12:52:45+5:302024-09-14T13:08:21+5:30
२०० पेक्षा अधिक खाते उघडणाऱ्याला पुण्याला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच अटक, १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी
छत्रपती संभाजीनगर : शेकडो बँक खाते उघडून त्याचा बेनामी व्यवहारासाठी वापर करणाऱ्या रॅकेटमध्ये शहरातील महाविद्यालयीन सुशिक्षित तरुण अडकले. दोन दिवसांपूर्वी रॅकेट उघडकीस येताच यात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या शहरातील २० पेक्षा अधिक तरुणांनी तपास यंत्रणेच्या भीतीने शहर सोडल्याचे समोर येत आहे. यापैकी पुण्याला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या ज्ञानेश्वर परमेश्वर पठाडे (२४, रा. बीडकिन) याला पोलिसांनी अटक केली.
दोन दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या बँक खात्यांमधील बेनामी व्यवहाराच्या घोटाळ्याने मोठे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आत्तापर्यंत यात सुरतचा उत्सवकुमार चंदुभाई भेसानिया (वय २३, रा. सुरत, गुजरात) हा शहरातील ऋषिकेश शिवनाथ भागवत (२३, रा. सिंहगड कॉलनी, एन-६) व अनुराग भाऊसाहेब घोडके (२१, रा. म्हसोबानगर, जाधववाडी) हे अटकेत आहेत. तिघांच्या मोबाइल, लॅपटॉप तपासत आहे. त्यातून ऋषिकेश सोबत टेलिग्रामद्वारे सातत्याने संवाद असलेल्या ज्ञानेश्वरची माहिती पथकाच्या हाती लागली. त्यानंतर त्याचा शोध सुरू झाला. शुक्रवारी त्याला पोलिसांचा ससेमिरा लागण्याची शक्यता वाटताच त्याने शहर सोडण्याची तयारी केली होती. मात्र, पहाटेच त्याला अटक करण्यात आली.
सिबिल स्कोअरचे आमिष, २०० पेक्षा अधिक खाते
कर्ज घेण्यासाठी सिबिल स्कोअर आवश्यक असतो. अनेक तरुणांना ऋषिकेश, ज्ञानेश्वरने सिबिल स्कोअर वाढवण्यासाठी ट्रेडिंग खाते उघडण्यास सांगितले. त्यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड घेतले. त्याद्वारे पैसे देण्याचे आमिष दाखवून जवळपास २०० पेक्षा अधिक खाते उघडले. निरीक्षक गीता बागवडे यांनी त्याला न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने १५ सप्टेंबरपर्यंत पाेलिस कोठडी सुनावली. आता ऋषिकेश, अनुराग व ज्ञानेश्वरची समाेरासमोर चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ही व्यक्ती कोण ?
शहर पोलिसांसह केंद्रीय तपास यंत्रणेचे पथक आरोपींची समांतर चौकशी करत आहे. ज्ञानेश्वरच्या मोबाइलद्वारे त्याने शुभम पाटील, निखिल जैन नामक व्यक्तींना क्रिप्टो करन्सीद्वारे पैसे पाठवल्याचे समोर आले आहे. शिवाय, ओमकार अकोलकर याने पठाडेला ११ बँक खाते उघडून देत वापरण्याची अनुमती दिली. आता पोलिस या तिघांचा शोध घेत आहे.
आखाती देशांच्या संबंधामुळे धक्का
या रॅकेटद्वारे देशविघातक कृत्यांसाठी पैशांचा वापर झाल्याचा दाट संशय तपास यंत्रणा व्यक्त करत आहे. अद्याप त्याचे सबळ पुरावे हाती लागले नसले तरी आखाती देशांमधून आलेल्या फंडिंग व व्यवहारामुळे तपास यंत्रणा अवाक् झाल्या आहेत. त्यामुळेच देशविरोधी कृत्यांचा संशय असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, शुक्रवारी एटीएसने देखील तिघांची चौकशी सुरू केली आहे.