करडी तेल भडकले; डाळी कडाडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:05 AM2019-05-23T00:05:17+5:302019-05-23T00:05:38+5:30
देशात लोकसभा निवडणुकीचा ज्वर चढला असताना दुसरीकडे बाजारपेठेत महागाईने डोके वर काढले आहे. करडी तेलाच्या भावाने तर आजपर्यंतचा उच्चांक गाठला आहे. तर डाळींमध्येही हळूहळू वाढ होत असून, १०० रुपयांच्या जवळ पोहोचण्यास त्यांची चढाओढ सुरू झाली आहे. यात सर्वसामान्य ग्राहक होरपळत आहे.
औरंगाबाद : देशात लोकसभा निवडणुकीचा ज्वर चढला असताना दुसरीकडे बाजारपेठेत महागाईने डोके वर काढले आहे. करडी तेलाच्या भावाने तर आजपर्यंतचा उच्चांक गाठला आहे. तर डाळींमध्येही हळूहळू वाढ होत असून, १०० रुपयांच्या जवळ पोहोचण्यास त्यांची चढाओढ सुरू झाली आहे. यात सर्वसामान्य ग्राहक होरपळत आहे.
दुष्काळाची तीव्रता आता जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर दिसून येऊ लागली आहे. कमी पावसामुळे मागील हंगामात करडीच्या उत्पादनाला फटका बसला होता. जालना, लातूर, सोलापूर, अकोला या भागांतून शहरात करडी तेलाची आवक होते. करडीच्या उत्पादनाची अद्ययावत आकडेवारी कृषी विभागाकडेही नसल्याने करडीचे उत्पादन किती घटले याचा अंदाज कोणालाही आला नाही. मात्र, नवीन करडीचा हंगाम सुरू होऊन चार महिने होत आले, पण अजूनही करडी तेलाची आवक वाढली नसल्याने आता त्याची तीव्रता जाणवू लागली आहे. जगन्नाथ बसैये यांनी सांगितले की, कमी पावसाचा फटका मागील वर्षी करडीच्या उत्पादनाला बसला आहे. परिणामी करडीची आवक कमालीची घटली आहे. करडीचे तेल फेब्रुवारीत वसंत पंचमीला १४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाले होते. यात चार महिन्यांत दीड हजार रुपये भाववाढ होऊन आजघडीला १६ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहे. पहिल्यांदा क्विंटलमागे दीड हजार रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. मागील आठवड्यात लिटरमागे १० रुपयांनी करडी तेल महागले असून, रविवारी १५५ ते १६० रुपये प्रतिलिटर विक्री झाले. पहिल्यांदाच करडी तेलाच्या भावाने लिटरमागे १५० रुपयांचा आकडा पार केला आहे. करडी बीचे भाव ३५०० हून थेट ४६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत जाऊन पोहोचले आहे. आता नवीन करडी येण्यासाठी ८ महिन्यांचा कालावधी बाकी आहे. आवक कमी राहिली तर येत्या काळात करडी तेल मिळणेही कठीण जाईल. करडी तेलाच्या भावाने आजपर्यंतचा उच्चांक गाठला आहे. यापूर्वी १३० रुपयांपर्यंत करडी तेल विक्री झालेले आहे. करडी महागताच शेंगदाणा तेलाचेही भाव वाढले आहेत. लिटरमागे ५ रुपयांनी भाववाढ होऊन १०५ ते ११० रुपये प्रतिलिटरने शेंगदाणा तेल विक्री होत आहे. बाकीच्या खाद्यतेलांचे दर स्थिर आहेत.
डाळी वधारल्या
मागील महिनाभरात डाळींचे भावही किलोमागे ८ ते १० रुपयांनी वधारले आहेत. महिनाभरापूर्वी ७२ ते ७६ रुपये विक्री होणारी मूग डाळ बुधवारी ८४ ते ९० रुपये किलोने विक्री झाली. तसेच मठ डाळ ८८ ते ९० रुपये, तूर डाळ ८२ ते ८६ रुपये, उडीद डाळ ६८ ते ७० रुपये तर हरभरा डाळ ६० ते ६४ रुपये प्रतिकिलोने विकत आहे. मागील हंगामात पाऊस कमी पडल्याने मूग, उडदाचा पेरा कमी झाला होता. तसेच पाणी कमी असल्याने रबी हंगामात हरभऱ्याचाही पेरा कमी झाला होता. पुढील महिन्यात पाऊस समाधानकारक पडला तरच मूग व उडदाची पेरणी होऊ शकते. त्यावरच पुढील तेजी-मंदी अवलंबून राहील.
चौकट
शेंगदाणा शंभरीजवळ
शेंगदाणा उत्पादक कर्नाटक व गुजरात राज्यात यंदा उत्पादन कमी झाले आहे. तसेच महाराष्ट्रातही उन्हाळी पीक कमीच आहे. परिणामी, शेंगदाणा महिनाभरात किलोमागे १० रुपयांनी वधारला आहे. मोंढ्यात किरकोळ विक्रीत एप्रिल महिन्यात ८० ते ८४ रुपये किलो मिळणारा शेंगदाणा बुधवारी ८४ ते ९४ रुपये प्रतिकिलो विकल्या जात होता. मॉलमध्ये तर ११० रुपये किलोने शेंगदाणा विकल्या जात आहे. नवीन शेंगदाणा सप्टेंबर महिन्यात येणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात गुजरात तर दुसºया पंधरवड्यात कर्नाटक राज्यातून शेंगदाण्याची आवक होईल. तोपर्यंत शेंगदाण्याचे भाव किती वाढतील, हे सांगणे सध्या कठीण आहे.