अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार करणाऱ्याला कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 06:29 PM2018-12-28T18:29:22+5:302018-12-28T18:30:55+5:30
३० जानेवारी २०१७ रोजी १६ वर्षीय मुलगी सायंकाळी साडेचार वाजता घरातून बाहेर पडली होती
औरंगाबाद : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर वर्षभर अत्याचार करणारा विजय बाबासाहेब आरगडे याला विशेष सत्र न्यायाधीश एस.एस. भीष्मा यांनी गुरुवारी (दि.२७) न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे पोलिसांनी
त्याची हर्सूल कारागृहात रवानगी केली.
३० जानेवारी २०१७ रोजी १६ वर्षीय मुलगी सायंकाळी साडेचार वाजता घरातून बाहेर गेली. बराच वेळ झाला तरी ती परत न आल्यामुळे तिचा नातेवाईकांकडे शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. त्या मुलीचा पाठलाग करून छेड काढणारा राजनगर, मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात राहणारा विजय बाबासाहेब आरगडे सुद्धा घरी नसल्याचे समजले. त्यामुळे त्याच दिवशी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात विजयविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी मुलीचा शोध घेतला. मात्र ती न सापडल्यामुळे हा गुन्हा बीड येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आला. अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती.
१७ डिसेंबर २०१८ रोजी पीडित मुलगी एक वर्षाच्या मुलीला घेऊन मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात हजर झाली. तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले की, तिचे लग्न आई-वडील आणि मामाने विजयसोबत लावून दिलेले आहे. हा खोटा जबाब अल्पवयीन मुलीने दबावाखाली दिला असल्याचे वडिलाने दिलेल्या अर्जात म्हटले. पोलिसांनी याची चौकशी करून अपहरण व अत्याचार करणारा विजय आरगडे याला बुधवारी (दि.२६) रात्री ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली.
गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, गुन्हा गंभीर असून पीडित मुलीला आरोपीने कुठे कुठे नेले, तिला का डांबून ठेवले याचा तपास करावयाचा आहे. विजयची वैद्यकीय तपासणी करावयाची आहे. मुलीची आणि विजयची डीएनए चाचणी घ्यावयाची असल्यामुळे पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली असता न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला.