मुदतीत फ्लॅट न दिल्याने बिल्डरला नोंदणीची रक्कम व्याजासह परत देण्याचे ग्राहक मंचाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 07:06 PM2019-05-30T19:06:01+5:302019-05-30T19:08:10+5:30
नोंदणी केलेली सुमारे पावणेदोन लाखांची रक्कम व्याजासह परत करा
औरंगाबाद : ग्राहकाला दिलेल्या मुदतीत सदनिकेचा ताबा न देणारे बांधकाम व्यावसायिक सुरेशपुरी गोसावी आणि सातारकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मालक अजय सातारकर यांनी स्वतंत्र अथवा संयुक्तपणे तक्रारदार अमर सोनटक्के यांनी सदनिकेच्या नोंदणीसाठी दिलेले १,७८,२३० रुपये १२ टक्के व्याजासह त्यांना परत करावेत. तसेच तक्रारदारांनी कर्जाच्या हप्त्यापोटी भरलेले २,८८,५४० रुपयेसुद्धा ९ टक्के दराने ‘डिमांड ड्राफ्ट’ च्या स्वरूपात देण्याचा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या अध्यक्ष स्मिता बी. कुलकर्णी आणि सदस्य संध्या बारलिंगे व किरण ठोले यांनी दिला आहे.
ग्राहक मंचाने या बरोबरच, बांधकाम व्यावसायिकांनी ६० दिवसांत तक्रारदाराच्या कर्ज खात्यात कर्जाची रक्कम ३,५१,५३२ रुपये १० टक्के व्याजदराने भरण्याचे आदेश दिले. प्रतिवादी दिवाण हाऊसिंग फायनान्स यांना कर्जाची रक्कम मिळाल्यानंतर ३० दिवसांच्या आत तक्रारदाराच्या नावे असलेले कर्ज खाते ‘शून्य’ करून ‘कर्ज बेबाकी’ (नो ड्यूज) प्रमाणपत्र आणि नुकसानभरपाईपोटी तक्रारदारास २०,००० रुपये डीडीच्या स्वरूपात द्यावेत. कर्जाची उर्वरित रक्कम वसुलीसाठी तक्रारदारास कोणतीही नोटीस देऊ नये. ती रक्कम वरील बांधकाम व्यावसायिकांकडून वसूल करावी.
तक्रारदारास बांधकाम व्यावसायिकाकडून रक्कम मिळाल्यानंतर ३० दिवसांत ‘नोंदणीकृत करारनामा’ रद्द करण्याची प्रक्रिया करावी. त्याचप्रमाणे बांधकाम व्यावसायिकांनी ३० दिवसांत तक्रारदारास भाड्यापोटी भराव्या लागलेल्या आर्थिक नुकसानीपोटी २५ हजार रुपये आणि या कार्यवाहीच्या खर्चाचे ५ हजार रुपये डीडीच्या स्वरूपात द्यावेत, असेही मंचाने आदेशात म्हटले आहे. तक्रारदार सोनटक्के यांनी २०१३-१४ मध्ये सातारा परिसरातील गुरुदेव रेसिडेन्सी येथे एक सदनिका ११,११,००० रुपयांना विकत घेण्याचे ठरविले. त्यांनी १६ एप्र्रिल २०१३ ला इसार पावतीची नोंदणी केली. तक्रारदाराने सातारकर यांना रोख एक लाख ११ हजार रुपये दिले. बँकेने मंजूर केलेल्या ७, ८०,०७२ पैकी ६,४०,०७२ रुपये बांधकाम व्यावसायिकांना वितरित केले. तक्रारदाराने कर्जापोटी बँकेला २,८८,०५० रुपये भरले.
सातारकर यांनी तक्रारदाराकडून ‘प्री ईएमआय’ च्या नावाखाली १२, ८३७ रुपये वसूल केले. त्यांनी ७० टक्के बांधकाम झाल्याचे सांगून बँकेकडून परस्पर रक्कम वितरित करून घेतली. तक्रारदारास घराचा ताबा न मिळाल्यामुळे भाड्याच्या घरात राहावे लागत आहे. सोनटक्के यांनी सातारकर यांना दिलेली रक्कम व्याजासह परत मिळावी म्हणून त्यांनी अॅड. आनंद मामीडवार यांच्यामार्फत तक्रार दाखल केली होती.
खालीलप्रमाणे रक्कम परत करण्याचा आदेश
तक्रारदाराने सदनिकेकरिता दिलेले १,७८,२३० रुपये करारनामा नोंदणीपासून १२ टक्के व्याज दराने तक्रारदाराच्या कर्ज खात्यातील कर्जाचे ३,५१,५३२ रुपये हप्ता भरल्याच्या शेवटच्या तारखेपासून १० टक्के व्याज दराने कर्जाच्या हप्त्यापोटी भरलेले २,८८,५४० रुपये ९ टक्के व्याज दराने तक्रारदारास भाड्यापोटी २५,००० रुपये तक्रारीच्या कार्यवाहीच्या खर्चाचे ५,००० रुपये
दिवाण हाऊसिंग फायनान्स यांनी तक्रारदारास परत करावयाची रक्कम
नुकसानभरपाईपोटी २०,००० रुपये
कर्जखाते ‘नील’ करावे आणि ‘नोड्यूज’ प्रमाणपत्र द्यावे. कर्जाच्या उर्वरित रकमेसाठी तक्रारदारास नोटीस देऊ नये.