महावितरणच्या कारभाराने ग्राहक वैतागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 09:53 PM2019-03-31T21:53:33+5:302019-03-31T21:53:56+5:30
तक्रारींचे निवारण केले जात नसून महावितरणचे अधिकारी टोलवा-टोलवी करीत असल्याचा आरोप वीज ग्राहकांनी केला आहे.
वाळूज महानगर : वाळूजमध्येमहावितरणकडून वीजग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले पाठविण्यात आली आहेत. यासंदर्भातील तक्रारींचे निवारण केले जात नसून महावितरणचे अधिकारी टोलवा-टोलवी करीत असल्याचा आरोप वीज ग्राहकांनी केला आहे. महावितरणच्या सावळ्या गोंधळामुळे वीज ग्राहकांत असंतोषाचे वातावरण आहे.
महावितरणच्या गलथान कारभारामुळे वीज ग्राहक कंटाळले आहेत. गावातील अनेकांना मीटर रिडींगप्रमाणे देयके न देता अंदाजे बिले दिली जात आहेत. वीज बिल न भरल्यास महावितरणचे अधिकारी व कर्मचारी वीज पुरवठा खंडीत करण्याच्या धमक्या देत असल्याने ग्राहकात असंतोषाचे वातावरण पसरले आहे. गावातील अनेक ग्राहकांचे वीज मिटर तपासणीसाठी महावितरणचे कर्मचारी घेऊन गेले आहेत. मात्र, तीन-तीन महिने या मीटरची तपासणी केली जात नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. तर दुसरीकडे नवीन वीज जोडणीसाठी अनामत रक्कम भरुनही मीटर देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची ओरड ग्राहकांतून होत आहे. ग्राहकांना घरपोच देयके न देता अन्यत्र ठेवली जात असल्याने ग्राहकांना ती मिळत नाहीत. त्यामुळे ती वेळेत भरली जात नाहीत. विलंबाने बिले भरल्यास ग्राहकांना विनाकारण दंडाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. विशेष म्हणजे भरमसाठी वीज देयके, मीटर तपासणी, नवीन मीटर जोडणी आदी संदर्भात महावितरण कार्यालयात तक्रारी करुनही याचे निवारण करण्यास महावितरणचे अधिकारी टोलवा-टोलवी करीत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. वरिष्ठ अधिकारीही स्थानिक कर्मचाऱ्यांची पाठराखण करीत असल्यामुळे ग्राहक संतप्त झाले आहे. विजयनगर या वसाहतीत कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने विद्युत मोटारी जळण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामारे जावे लागत असल्याचे गावातील विठ्ठल त्रिभुवन, सुरेश जाधव, बिस्समिल्लाबी शेख, विमलबाई खंडागळे आदींनी सांगितले.
आंदोलनाचा इशारा
महावितरणच्या गलथान कारभारामुळे ग्राहक त्रस्त झाले असून तक्रारीचे निवारणही होत नसल्यामुळे ग्राहकात असंतोष धुमसत आहेत. विजयनगरात ३ फेजची व्यवस्था करुन विज पुरवठा सुरळीत करावा, ग्राहकांची होणारी लूट थांबविण्यात यावी, अन्यथा ८ एप्रिल रोजी महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा रतन अंबिलवादे, रज्जाक शेख, विठ्ठल त्रिभुवन, सुलेमान शेख, बशीर पठाण, मिना पारखे, सुजाता बागुल, सावित्रीबाई त्रिभुवन,छाया त्रिभुवन, शोभा जाधव, समिना पठाण, परवीन शेख, आशा सोनवणे, शिल्पा जाधव, सुरेखा वंजारे, जया थोरात, जयश्री थोरात, राधाबाई पोपळघट, सोनाली हिवाळे आदींनी दिला आहे.