दिवाळीमुळे बँकांत ग्राहकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 06:48 PM2018-11-03T18:48:28+5:302018-11-03T18:49:02+5:30
वाळूज महानगर: वाळूज औद्योगिकनगरीत कामगारांना बोनस व वेतन मिळाल्यामुळे बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. मात्र, ढिसाळ नियोजनामुळे ग्राहकांना तासन-तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत.
वाळूज महानगर: वाळूज औद्योगिकनगरीत कामगारांना बोनस व वेतन मिळाल्यामुळे बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. मात्र, ढिसाळ नियोजनामुळे ग्राहकांना तासन-तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत.
उद्योगनगरीतील बहुतांश कामगारांचे वेतन आॅनलाईन पद्धतीने या भागातील बँक खात्यात जमा होते. आता दिवाळीचा बोनस व वेतन बँकात जमा झाला आहे. त्यामुळे बजाजनगर, पंढरपूर, रांजणगाव, साजापूर, वाळूज आदी ठिकाणी असलेल्या बँकेत पैसे काढण्यासाठी कामगारांची गर्दी होत आहे. याच बरोबर विविध व्यवसायिक, उद्योजक व ग्राहकांची बँकांत पैसे काढण्यासाठी व भरण्यासाठी गर्दी होत आहेत.
अनेक कामगार बँकेतून पैसा काढून मुळगावी कुटुंबियांना पैसे पाठवतात. मात्र, गर्दीमुळे ग्राहकांना तासन-तास बँकेत रांगेत उभे राहावे लागत आहे. या भागातील एटीममध्ये पैसे काढण्यासाठी रांगा लागत असल्यामुळे महिलांनाही त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे बँकेत व्यवहार करण्यासाठी आलेल्या ग्राहकांशी बँकेतील अधिकारी व कर्मचारी सौजन्याने वागत नसल्याने ग्राहकांत नाराजीचा सूर उमटत आहे.
ग्राहकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन बँक प्रशासनाकडून वाढीव काऊंटर सुरु करण्याची मागणी अर्जुन आदमाने, सिद्राम पारे, अनिल जाभाडे, शेख मन्सूर आदीसह त्रस्त ग्राहकांनी केली आहे.