हायवेसाठी १८ हजार मोठ्या झाडांची ‘कटिंग’, त्या बदल्यात खुरट्या झाडांची ‘सेटिंग’
By साहेबराव हिवराळे | Published: August 18, 2022 12:27 PM2022-08-18T12:27:51+5:302022-08-18T12:28:22+5:30
३० किलोमीटरमधील १८ हजार झाडे कापली : तुलनेत तीन ते पाच पट लावण्याची गरज होती
- साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : सोलापूर-धुळे महामार्गाच्या कामासाठी औरंगाबाद शहरालगत ३० किलोमीटर अंतरावर १८ हजार झाडांची कत्तल करण्यात आली. अगदी तीस ते चाळीस वर्षांपूर्वीचे वटवृक्ष आणि इतर झाडांची त्यात ‘खांडोळी’ झालेली आहे. समृद्धी महामार्गातही ३ हजार झाडांची कत्तल झाली; परंतु त्या तुलनेत अजून झाडे लावण्यात आलेली नाहीत. सोलापूर हायवेला खुरटी झाडे लावून शंभर टक्के रोपण केल्याचे सांगितले जाते. दुभाजक आणि रस्त्याच्या कडेला वापरण्यात येणाऱ्या झाडांची संख्या तोडलेल्या झाडांपेक्षा पाच पटीत लावली तरी कमीच पडणार आहे.
औरंगाबाद शहराजवळून आणि मराठवाड्यातून जाणाऱ्या महामार्गामुळे जिल्ह्यात ३२ हजार झाडांची कत्तल झाली. तसेच ४ डोंगर आणि १२ टेकड्या भुईसपाट करण्यात आल्या. रस्त्यांच्या कामांमुळे निसर्गाचे प्रचंड नुकसान झाले आहे, वृक्षतोडीमुळे वाळवंटीकरण सुरू आहे, त्यामुळे पर्जन्यमान कमी होणार आहे. जैवविविधता मोठ्या प्रमाणावर नष्ट झालेली आहे. महामार्ग करताना जनतेची सोय म्हणून उदो उदो केला जात आहे; पण दुसरी बाजू म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास मात्र लपवला जात आहे.
महामार्ग बांधणी करताना अनेकदा सूचना देऊनही प्राण्यांसाठी खालून आवागमनाचे मार्ग म्हणजेच अंडरपास बहुतांश ठिकाणी बनवले नाहीत किंवा त्या भागात उंच कुंपण केलेले नाही. रोज या भागात अपघातात वन्य जिवांचा मृत्यू ओढवत आहे. समृद्धी रस्त्यावरही परिस्थिती वेगळी नाही. महामार्गाच्या एकूण खर्चाच्या एक टक्का रक्कम ही झालेल्या निसर्गहानीच्या भरपाईसाठी राखीव असताना आणि आधी वृक्षारोपण करावे, अशी तरतूद असताना वापरण्यात आलेली नाही.
वृक्षप्रेमींमध्ये नाराजी
केंद्र व राज्य शासनाला निवेदन पाठवून ‘आपण झाडे तोडली, पण लावणार कोण?’ हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर पंतप्रधान कार्यालयाने तसेच तत्कालीन राज्य शासनाने राज्यातील औरंगाबाद, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, कोकण या सर्व मुख्य अभियंत्यांना पत्रे पाठविली आहेत. मात्र, यावर अतिशय संथगतीने काम सुरू आहे.
- राहुल देव मनवर
महामार्गाच्या दुतर्फा स्वदेशी झाड लावा...
एप्रिल महिन्यात केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन तोडलेल्या झाडांच्या बदल्यात झाडे लावली नसल्याचे सांगितले. तसेच महामार्गाच्या दुतर्फा स्वदेशी स्थानिक वृक्ष लावण्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी केली होती.
- डॉ. किशोर पाठक, मानद वन्यजीव रक्षक
अमृत महोत्सवातही लावली झाडे...
सर्व अधिकार वन विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडे आहेत. वृक्षारोपणाचे काम १०० टक्क्यांपर्यंत झालेले आहे. अमृतमहोत्सवात तीसगाव परिसरात वन विभाग आणि कंपनीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले आहे.
- केतन वाकणकर, एलएनटी नियोजन अधिकारी