बँक खाते सुरु करण्याच्या नावाखाली गोपनीय माहिती विचारली, १५ मिनिटांत ४ लाख झाले लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 05:01 PM2022-06-02T17:01:14+5:302022-06-02T17:05:13+5:30
Cyber Crime: निष्क्रिय बँक खाते सुरु करण्याच्या नावाखाली फोन करत साडेचार लाख केले लंपास
- श्रीकांत पोफळे
करमाड (औरंगाबाद) : निष्क्रिय खाते पुन्हा सुरू करण्यासाठी बँकेत कागदपत्रे जमा केल्यानंतर अवघ्या १० मिनिटांतच सायबर भामट्यांनी खातेदारास फोन करून गोपनीय माहिती मिळवत खात्यावरील ४ लाख ५९ हजार रुपये लंपास केल्याची घटना औरंगाबाद तालुक्यातील देमणी वाहेगाव येथे उघडकीस आली आहे. सतीश पांडुरंग शिंदे असे खातेधारकाचे नाव असून करमाड येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत त्यांनी कागदपत्रे जमा केली होती.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, सतीश शिंदे यांचे औरंगाबाद तालुक्यातील करमाड येथील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत बचत खाते आहे. त्यांना २६ मे रोजी संध्याकाळी आपले खाते बंद होणार असून ते सुरु ठेवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करा असा sms ९६४१६२७७८४ या क्रमांकावरून आला. २७ मे रोजी शिंदे यांनी या क्रमांकावर कॉल केला असता त्यांनी खाते नंबर विचारला. त्यामुळे शिंदे यांना शंका आली यांनी बँकेच्या कस्टमर केअर क्रमांकावर चौकशी केली असता त्यांनी खाते नंबर कोणालाही देऊ नका व कागदपत्रे घेऊन बँकेत जाण्यास सांगितले.
तेव्हा शिंदेही आधार कार्ड पॅन कार्डची झेरॉक्स घेऊन करमाड येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत गेले बँकेच्या महिला अधिकाऱ्याकडे कागदपत्र जमा केली. बँकेतून बाहेर निघाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटात त्यांना फोनवर संपर्क करण्यात आला. फोनवर समोरच्या व्यक्तीने, तुम्ही पंधरा मिनिटांपूर्वी सपना मॅडमकडे कागदपत्र दिली, मात्र एटीएमची माहिती दिली नाही. त्यामुळे तुमचे खाते सुरु करण्यात आलेले नाही, असे सांगितले.
त्यानंतर सायबर भामट्यांनी शिंदे यांच्याकडून संपूर्ण एटीएम क्रमांक व पिन विचारला. त्यानंतर शिंदे कंपनीत कामावर गेले. दरम्यान, खात्यातून ४ लाख ५९ हजार रुपये काढून घेण्यात आल्याचे मेसेज आले. पण मोबाईल गेटवर जमा असल्याने शिंदे यांना ते पाहता आले नाही. रात्री कंपनीतून घरी जाताना मेसेज पाहिल्यानंतर खात्यावरील रक्कम कमी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या प्रकरणी शिंदे यांनी खाते नंबर , एटीएम नंबर , एटीएम पिन अशी गोपनीय माहिती देऊन चूक केली हे जरी खरे असले. तरी बँकेत दिलेल्या कागदपत्रांची माहिती पंधरा मिनिटात ऑनलाइन गंडा घालणाऱ्या टीमला कशी मिळते ? हा प्रश्न घटनेमुळे उपस्थित होत आहे. या घटनेत संदर्भात शिंदे यांनी पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण यांच्याकडे लेखी तक्रार केली असून त्या संदर्भात चौकशी देखील सुरू आहे.
वापरात नसल्याने शिंदे यांचे खाते निष्क्रिय होते. त्यांनी मेसेजनंतर कागदपत्रे जमा केली. मात्र, याची माहिती ऑनलाइन गंडा घालणाऱ्या भामट्यांना कशी मिळाली हे सांगता येणार नाही. खाते धारकांनी गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये.
- अंकिता पवार, शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, करमाड