सायबर भामट्यावर विश्वास बसला अन् १० लाख ५५ हजार गमावले; चार दिवस चालला एक टास्क 

By राम शिनगारे | Published: October 12, 2022 10:09 PM2022-10-12T22:09:45+5:302022-10-12T22:11:41+5:30

अशोकने सायबर भामट्यांनी पाठविलेल्या लिंकद्वारे यूपीआय आयडीवर तब्बल २८ वेळा पैसे पाठवले. त्यातील सुरुवातीच्या तीन वेळाच भरलेल्या पैशाला मोठ्या प्रमाणात परतावा मिळाला. त्याला भुलून उर्वरित पैसे गमावल्याचे स्पष्ट झाले.

cyber crime believing in cyber thief and lost 10 lakh 55 thousand a task that lasted four days in aurangabad | सायबर भामट्यावर विश्वास बसला अन् १० लाख ५५ हजार गमावले; चार दिवस चालला एक टास्क 

सायबर भामट्यावर विश्वास बसला अन् १० लाख ५५ हजार गमावले; चार दिवस चालला एक टास्क 

googlenewsNext

 

औरंगाबाद: झटपट पैशांसाठी पार्टटाइम जॉबचा एक ‘टास्क’ युवकाच्या चांगलाच अंगलट आला आहे. व्हाॅट्सॲपवर आलेल्या लिंकवर माहिती भरल्यानंतर दिलेल्या टास्कवर विश्वास ठेवत स्वत:सह मित्रांच्या फोन पे वरून ‘युपीआय’ आयडीवर तब्बल १० लाख ५५ हजार ५३ रुपये पाठविले. हे सर्व पैसे सायबर भामट्यांनी हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अशोक (नाव बदलले आहे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते शेंद्रा एमआयडीसीतील एका कंपनीत आहेत. त्यांना ४ ऑक्टोबर रोजी अनोळखी व्हाॅट्सॲप क्रमांकावरून पार्टटाइम जॉबसाठी मेसेज आला. मेसेजमध्ये १,८०० ते १० हजार कमवा असे लिहिले होते. अशोक यांनी संबंधित व्हाॅट्सॲपवर चर्चा केली. समोरील व्यक्तीने जॉबसाठी आमचा टास्क पूर्ण करावा लागेल, अशी माहिती दिली. त्यासाठी एक लिंकही पाठवली. त्या लिंकवर अशोकने सर्व माहिती भरली. त्यानंतर फोन पे द्वारे आरोपीने दिलेल्या युपीआय आयडीवर १०० रुपये भरले. तेव्हा अशोकच्या बँक खात्यात २२८ रुपये जमा झाले. पहिल्या ट्रान्झॅक्शननंतर अशोकच्या टेलिग्रामवर लिंक मिळाली. त्यातही अशोकने सर्व माहिती भरली. ५ ऑक्टोबर रोजी अशोकला टेलिग्रामवर संदेश आला. त्यात एक हजार रुपये भरून तुमचा टास्क पूर्ण करा, असे सांगितले. त्यानुसार त्याने एक हजार भरल्यावर त्याच्या बँक खात्यात एक हजार ४३६ रुपये जमा झाले. त्यानंतर त्याने पुन्हा तीन हजार रुपये भरले. तेव्हा चार हजार ३९९ रुपये जमा झाले. या दोन टास्कमुळे अशोकचा विश्वास बसला आणि त्यातच घात झाल्याचे स्पष्ट झाले. अधिक तपास निरीक्षक संतोष घुगे करीत आहेत.   

चार दिवस चालला एक टास्क -
अशोकचा टेलिग्रामवरील टास्कवर विश्वास बसल्यानंतर एक मोठा टास्क मिळाला. त्यानुसार अशोकने ५ ऑक्टोबर रोजी लिंकद्वारे मिळालेल्या ‘यूपीआय’ आयडीवर स्वत: व मित्रांमार्फत वेळोवेळी पैसे भरले. ८ ऑक्टोबर रोजी टेलिग्रामधारकाने टास्क पूर्ण झाला असल्याचा मेसेज दिला. त्यानुसार पैसे काढण्यासाठी तुमचा टास्क म्हणून दोन वेळा ९० हजार, ८५ हजार ५००, ३५ हजार, ७२ हजार, १०० आणि २०० रुपये प्राप्त यूपीआय आयडीवर पाठवले. जमा केलेली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता निघालीच नाही. एकूण १० लाख ५५ हजार ५३ रुपये चार दिवसांच्या टास्कमध्ये भरण्यात आले. ते काढण्यासाठी पुन्हा ९ लाखांचा टास्क दिला. मात्र, शंका आल्यामुळे अशोकने पैसे भरले नाहीत.

२८ वेळा पैसे पाठवले -
अशोकने सायबर भामट्यांनी पाठविलेल्या लिंकद्वारे यूपीआय आयडीवर तब्बल २८ वेळा पैसे पाठवले. त्यातील सुरुवातीच्या तीन वेळाच भरलेल्या पैशाला मोठ्या प्रमाणात परतावा मिळाला. त्याला भुलून उर्वरित पैसे गमावल्याचे स्पष्ट झाले.

युवक प्रचंड घाबरला -
अशोकला फसवणूक झाल्याचे कळाल्यानंतर तो प्रचंड घाबरला. जवळचे पैसेच गेल्यामुळे तो हादरला. ग्रामीण सायबर पोलिसांनी त्यास धीर देत शांत केले. तसेच पैसे परत मिळविण्यासाठी तत्काळ संबंधित गेट-वेशी संपर्क साधला. मात्र पैसे परत मिळतील की नाही, याविषयी पोलिसांनाही संशयच आहे.

Web Title: cyber crime believing in cyber thief and lost 10 lakh 55 thousand a task that lasted four days in aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.