सायबर क्राईमचा टक्का वाढला !
By Admin | Published: April 30, 2017 11:49 PM2017-04-30T23:49:38+5:302017-04-30T23:51:43+5:30
लातूर : लातूर शहर आणि जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सायबर क्राईमचा टक्का वाढला आहे
लातूर : लातूर शहर आणि जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सायबर क्राईमचा टक्का वाढला आहे. विशेष म्हणजे आॅनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर आहे. तशी नोंद सायबर लॅबकडे झाली आहे. गेल्या चार महिन्यांत सायबर लॅबकडून ४०२ गुन्ह्यांचा शोध सुरू आहे. यातील २५ टक्के गुन्हे आॅनलाईन फसवणुकीचे आहेत. लातूर जिल्ह्यातील एकूण २४ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सायबर क्राईम अंतर्गत येणाऱ्या विविध गुन्ह्यांच्या घटना घडल्या आहेत. हा टक्का प्रत्येक वर्षी ४०० गुन्ह्यांनी वाढत आहे. चार वर्षांखाली हा आकडा १२०० च्या आसपास होता. आता तोच आकडा १६०० च्या पुढे सरकला आहे. आॅनलाईन बँकिंग, एटीएम फसवणूक, आॅनलाईन गंडा आदी प्रकार मोठ्या प्रमाणावर घडल्याची नोंद संबंधित पोलीस ठाण्यांकडे आहे. विशेष म्हणजे बँकेतून अधिकारी बोलतोय, अशी बतावणी करीत सर्वसामान्य नागरिकांना त्यांचे बँक खाते क्रमांक, एटीएम पासवर्ड क्रमांक, त्याचबरोबर आधार लिंकिंग विचारून हजारो रुपयांना गंडविल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यांकडे प्राप्त झाल्या आहेत. अशा घटनांमध्ये निनावी फोन क्रमांकावरून येणाऱ्या कॉलवर संबंधित बँक खातेधारकांनी विश्वास ठेवत दिलेली माहिती सायबर क्राईमसारख्या गुन्ह्यांना पोषक ठरली आहे. आॅनलाईन गंडविण्याच्या घटनांची नोंद मोठ्या प्रमाणावर पोलीस दप्तरी झाली आहे. जानेवारी ते एप्रिल २०१७ अखेरपर्यंत तब्बल ४०० गुन्हे सायबर क्राईम अंतर्गत नोंदविण्यात आल्या आहेत. या गुन्ह्यांतील आरोपी शोधण्याचे आव्हान सायबर लॅबसह संबंधित पोलीस ठाणे आणि तपास अधिकाऱ्यांसमोर आहे. सायबर क्राईम अंतर्गत येणारे फसवणुकीचे गुन्हे अधिक आहेत. (प्रतिनिधी)