शेतीचे नष्टचक्र सुरूच; खरीप हंगाम आधी सुकला अन् आता सडतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:04 AM2021-09-24T04:04:07+5:302021-09-24T04:04:07+5:30
बनकिन्होळा : सिल्लोड तालुक्यातील निल्लोड महसूल मंडळात मंगळवारी सायंकाळी दोन तास ढगफुटीसदृश धो धो पाऊस झाला. एकाच दिवसांत ८८ ...
बनकिन्होळा : सिल्लोड तालुक्यातील निल्लोड महसूल मंडळात मंगळवारी सायंकाळी दोन तास ढगफुटीसदृश धो धो पाऊस झाला. एकाच दिवसांत ८८ मिलीमीटर पाऊस झाल्याने बनकिन्होळा परिसरातील हजारो हेक्टरवरील खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. सुरुवातीला चांगल्या पावसाच्या आगमनानंतर महिनाभर पावसाने तडा दिल्याने पिके सुकली होती. यातून पीक सावरत नाही, तर आता सततच्या पावसाने पिके सडू लागली आहेत. शेतीचे हे नष्टचक्र जणूकाही शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेले आहे.
२१ सप्टेंबर रोजी दमदार पावसाने हजेरी लावली. यानंतर गुरुवारी पुन्हा मुसळधार पाऊस झाला. यामुळे परिसरातील नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. मका, कापूस, ऊस, सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. फडातील ऊस भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. सोयाबीन व फळबागांसह मिरची व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. हा पाऊस वेळीच न थांबल्यास हाती आलेली खरीप पिके वाया जाण्याची भीती सतावत आहे. कीड व विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढीस लागल्याने शेतकऱ्यांचा खर्चही वाढला आहे.
फोटो कॅप्शन : बनकिन्होळा परिसरात शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. यामुळे रानातील पिके पिवळी पडत आहेत.