रविवारी रंगणार सायक्लोथॉन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:43 AM2019-01-15T00:43:46+5:302019-01-15T00:43:58+5:30
पर्यावरणाचा आणि फिटनेसचा संदेश देणारी सायक्लोथॉन २0 जानेवारी रोजी होणार आहे. इंडियन आॅईलतर्फे याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती इंडियन आॅईलच्या औरंगाबाद विभागाचे डेप्युटी जनरल मॅनेजर एस. एम. तुमाने यांनी पत्रकार परिषदेत दिली. या सायक्लोथॉनला विभागीय क्रीडा संकुल येथून सकाळी ७ वाजता सुरुवात होणार आहे.
औरंगाबाद : पर्यावरणाचा आणि फिटनेसचा संदेश देणारी सायक्लोथॉन २0 जानेवारी रोजी होणार आहे. इंडियन आॅईलतर्फे याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती इंडियन आॅईलच्या औरंगाबाद विभागाचे डेप्युटी जनरल मॅनेजर एस. एम. तुमाने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या सायक्लोथॉनला विभागीय क्रीडा संकुल येथून सकाळी ७ वाजता सुरुवात होणार आहे. याचा मार्ग शाहनूरमियाँ दर्गा रोडमार्गे, सिग्मा हॉस्पिटल, वीर सावरकर चौक, चेतक घोडा, रामायणा कल्चरल हॉल, जवाहरनगर पोलीस स्टेशन चौक, सूतगिरणी चौकामार्गे पुन्हा विभागीय क्रीडा संकुल असा आहे. यात सहभागी होणाऱ्या सर्वांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
या उपक्रमांतर्गत पेट्रोल, डिझेलची बचत करणे, तसेच पर्यावरण व फिटनेसविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने या सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. पेट्रोलियम पदार्थांची बचत करणे ही सर्व नागरिकांची जबाबदारी आहे. प्रत्येकाने आठवड्यातून एक दिवस मोटारसायकल व कारचा वापर टाळल्यास मोठ्या प्रमाणात पेट्रोल व डिझेलची बचत होऊ शकते. नेमक्या याच गोष्टीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ‘सायक्लोथॉन’चे आयोजन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे देशातील २०० शहरांत एकाच दिवशी पेट्रोलियम पदार्थांसंदर्भात जनजागृतीस्तव हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये विविध शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी, युवक-युवती, महिला-पुरुषांसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सायकल चालवून स्वत:ला तंदुरुस्त तर ठेवता येतेच, शिवाय पर्यावरणाची हानीदेखील टाळता येऊ शकते, असे तुमाने यांनी सांगितले.
स्वच्छ व पर्यावरणाच्या संरक्षणाचा विचार करता एक दिवस पेट्रोल-डिझेलच्या वाहनांचा वापर टाळल्यास देशाच्या प्रगतीत आपले अमूल्य असे योगदान दिले जाऊ शकते, असा संदेश पंतप्रधानांनी दिलेला आहे. सायकलिंगच्या प्रचारासाठी ‘सायक्लोथॉन’ हा अतिशय उपयुक्त असा उपक्रम ठरणार आहे. या उपक्रमात सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन इंडियन आॅईल व पेट्रोलियम कंझर्व्हेशन अँड रिसर्च असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी सत्यम वर्मा व प्रकाश एन. व राहुल दास यांचीही उपस्थिती होती.