सिलिंडरमध्ये एक ते अडीच किलो गॅस कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 05:12 PM2019-02-12T17:12:19+5:302019-02-12T17:12:58+5:30
वितरणादरम्यान अनेक ग्राहकांना एक ते अडीच किलोपर्यंत वजन कमी असलेले सिलिंडर मिळाले.
औरंगाबाद : गारखेडा परिसरातील इंडियन आॅईलच्या सौरभ गॅस एजन्सीकडून देण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरच्या मापात पाप सुरू असल्याचा प्रकार सोमवारी समोर आला. कडा कार्यालय परिसरात वितरणादरम्यान अनेक ग्राहकांना एक ते अडीच किलोपर्यंत वजन कमी असलेले सिलिंडर मिळाले. याविषयी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त के ला.
सौरभ गॅस एजन्सीतर्फे कडा कार्यालयाच्या परिसरातील मोकळ्या जागेत सोमवारी ग्राहकांना गॅस सिलिंडरचे वितरण करण्यात येत होते. सिलिंडर भरलेल्या वाहनातून एक-एक सिलिंडर रांगेत उभ्या ग्राहकांना देण्यात येत होते.
बऱ्याच वेळ उभे राहिल्यानंतर मिळालेल्या गॅस सिलिंडरच्या वजनाविषयी काही ग्राहकांना शंका आली. त्यामुळे गॅस वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे त्यांनी वजन काट्याची मागणी केली; परंतु यावेळी वजनकाटा नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे काही ग्राहकांनी बाहेर जाऊन सिलिंडरचे वजन केले, तेव्हा दोन ते अडीच किलोपर्यंत वजन कमी आढळले. याविषयी ग्राहकांनी एजन्सीच्या व्यवस्थापकांना माहिती दिली. या प्रकारामुळे गॅस वितरण होणाऱ्या ठिकाणी ग्राहकांनी संताप व्यक्त करीत कर्मचाऱ्याला धारेवर धरले.
याविषयी माहिती मिळताच एजन्सीचे अन्य कर्मचारी वजनकाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा सर्वांसमोर सिलिंडरचे वजन करण्यात आले. यावेळीही सिलिंडरमध्ये वजन कमी असल्याचे स्पष्ट दिसून आले. किरण वाळके, विठ्ठल पारटकर, शांताराम आगलावे, काशीनाथ ढेरे, प्रल्हाद झिंझुर्डे आदी ग्राहकांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.
एका सिलिंडरमागे ९० रुपयांचा फटका
एकूण २९.६ किलो वजन असलेल्या सिलिंडरमध्ये १४.२ किलो इतका गॅस असतो. सिलिंडरसाठी ६६६ रुपये आकारण्यात येतात. जर एका सिलिंडरचे दोन किलो वजन कमी भरत असेल, तर त्यापोटी ग्राहकाला किमान ९० रुपयांचा फटका बसतो.
तांत्रिक दोष
सिलिंडरमध्ये यंत्राच्या माध्यमातून गॅस भरला जातो. त्यामुळे तांत्रिक दोषामुळे गॅस कमी येऊ शकतो. ज्यांची तक्रार होती, त्यांना सिलिंडर बदलून दिले. वजनकाटा आज विसरला होता.
- सौरभ केदारे, सौरभ गॅस एजन्सी
अडीच किलो कमी
गॅस लवकर संपत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे आज एजन्सीकडून मिळालेले सिलिंडर कमी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे बाहेर त्याचे वजन केले, तेव्हा अडीच किलो वजन कमी होते. १०० ग्रॅमपर्यंत वजन कमी असेल तर चालेल; परंतु दोन-दोन किलो कमी मिळत असेल तर सर्वसामान्य आर्थिक झळ कशी सहन करतील.
-किरण वाळके
कारवाई करावी
२९ किलो वजन असलेले सिलिंडरचे वजन २७ किलो भरले. ही नागरिकांची फसवणूक आहे. यासंदर्भात प्रशासनाने योग्य पाऊल उचलून कारवाई केली पाहिजे.
-शांताराम आगलावे
वजनकाटा नसतो
एजन्सीकडून वजनकाटा ठेवलाच जात नाही. आज जो वजनकाटा होता, तोही खराब होता. यापूर्वीही अनेकदा कमी गॅस मिळालेला आहे.
-विठ्ठल पारटकर