दाभोलकर हत्या प्रकरण: सचिनकडे आल्याचे सांगत एटीएसने केली कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 02:47 AM2018-08-19T02:47:34+5:302018-08-19T02:48:09+5:30
निरालाबाजार भागातील कुलकर्णीच्या हॉटेलवर सचिन अणदुरेचा नेहमी वावर होता, अशीही माहिती सूत्रांकडून मिळाली.
औरंगाबाद : निरालाबाजार भागातील कुलकर्णीच्या हॉटेलवर सचिन अणदुरेचा नेहमी वावर होता, अशीही माहिती सूत्रांकडून मिळाली. कुलकर्णी सनातनचे स्थानिक सर्वेसर्वा आहेत. त्याच्या मार्गदर्शनाखालीच सर्व कामकाज चालते. सचिन मागील काही वर्षांपासून स्लीपर सेलसारखी भूमिका बजावत होता. कुलकर्णीच्या मार्गदर्शनानुसार सचिनही इतर साधकांप्रमाणे काम करीत होता, अशीही माहिती समोर येत आहे.
‘त्या दिवशी चार ते पाच जणांना इमारतीत घुसताना पाहून घरमालक राधाकिसन शिंदे यांनी त्यांना हटकले. आम्ही सचिनकडे आलोय, असे सांगत ते थेट सचिनच्या घरात गेले. त्यानंतर तासभर घरात थांबून ते सचिनला सोबत घेऊन मुंबईला गेले. तेव्हा पोलिसांनी सचिनला नेल्याची कल्पनाही शिंदे यांना आली नाही; परंतु त्याच दिवशी सचिनची पत्नी मुलीसह माहेरी गेल्याने चार दिवसांपूर्वी त्याच्या घराला कुलूप आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
औरंगाबादकर हादरले...
दाभोलकर यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्टÑ हादरला होता. या हत्येप्रकरणी औरंगाबादहून सचिनला अटक झाली. शनिवारी रात्री सीबीआयने सचिनला अटक केल्याची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे औरंगाबादकरांनाही धक्काच बसला. दाभोलकर यांचे मारेकरी औरंगाबादेत सापडतील याचा विचारही त्यांनी केला नव्हता. रात्री उशिरा हे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच एकच खळबळ उडाली होती. अनेक जण सचिन अणदुरे कोण, याची माहिती घेण्याचा प्रयत्न करीत होता.
१४ पासून घराला कुलूप
सचिन अणदुरेला १४ आॅगस्टला पोलीस मुंबईला घेऊन गेले. त्यानंतर त्याची पत्नी घराला कुलूप लावून कोठे गेली, हे घरमालक शिंदे यांना सांगता आले नाही. त्यास एक भाऊ असून, तो गारखेडा परिसरात राहतो. कुंवारफल्लीतील नागरिकांनाही सचिनबद्दल फारशी माहिती नाही. तो शांत स्वभावाचा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
दहा महिन्यांपूर्वी भाडेकरू म्हणून आला
सचिन राहतो ते घरमालक राधाकिसन बाबूराव शिंदे (रा. कुंवारफल्ली) हे महाराष्ट्र बँकेतून नुकतेच निवृत्त झाले. ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी सांगितले की, ते बँकेत कार्यरत असताना सचिन कापड दुकानदाराच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी नेहमी येई. त्यामुळे त्याची ओळख झाली. त्यावेळी तो धावणी मोहल्ल्यात राहत होता. दहा महिन्यांपूर्वी तो माझ्या घरात भाडेकरू म्हणून आला. तीन महिन्यांपूर्वी त्यांना मुलगी झाली. दोघेही पती-पत्नी कामाला जात. तो न चुकता नियमित भाडे द्यायचा. तो मितभाषी आहे. तो रोज सकाळी कामावर जायचा आणि रात्री दहा वाजेनंतर घरी परत यायचा.