बापरे...रोज लागतोय १५ टन ऑक्सिजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:02 AM2021-03-07T04:02:51+5:302021-03-07T04:02:51+5:30
औरंगाबाद : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि रुग्णसंख्येमुळे औरंगाबादेत पुन्हा एकदा ऑक्सिजनचा वापर वाढला आहे. अवघ्या १५ दिवसांपूर्वी रोज आठ ...
औरंगाबाद : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि रुग्णसंख्येमुळे औरंगाबादेत पुन्हा एकदा ऑक्सिजनचा वापर वाढला आहे. अवघ्या १५ दिवसांपूर्वी रोज आठ टन ऑक्सिजन लागत होता; परंतु आता यात दुपटीने वाढ झाली असून, दररोज तब्बल १५ टन ऑक्सिजन लागत आहे.
जिल्ह्यात ऑक्टोबरपासून कोरोनाचा विळखा सैल झाला होता. कोरोना रुग्णांची, त्यातही गंभीर रुग्णांची संख्याही कमी झाली होती. त्यामुळे रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनची मागणीही कमी झाली. जानेवारीपर्यंत ही परिस्थिती कायम होती; परंतु फेब्रुवारीत संपूर्ण परिस्थितीच बदलून गेली. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली. घाटीसह खासगी रुग्णालये रुग्णांनी भरली आहेत. त्यात आता पुन्हा एकदा गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याची चिन्हे आहेत. परिणामी, ऑक्सिजनची मागणी वाढते आहे. फेब्रुवारीपूर्वी ऑक्सिजनची रोजची मागणी आठ टनांपर्यंत घसरली होती; परंतु आजघडीला रोज १५ टन ऑक्सिजन लागत आहे. घाटीतही ऑक्सिजनची मागणी वाढल्याचे अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांनी सांगितले. चाकण-पुणे, रायगड, ठाणे यासह औरंगाबाद जिल्ह्यातील विविध पुरवठादारांकडून औरंगाबाद जिल्ह्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. रुग्णांची संख्या वाढत असली तरी सध्या भरपूर ऑक्सिजन उपलब्ध असल्याचे औषध प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
ऑक्सिजन मुबलक उपलब्ध
गेल्या १५ दिवसांत ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. सध्या रोज १५ टन ऑक्सिजन लागत आहे. ही मागणी आठ टनांपर्यंत आली होती. सध्या मुबलक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध आहे.
-संजय काळे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन