पप्पा, तुम्हीही लहान गणेश मूर्ती बनवल्या असत्या तर...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 07:29 PM2020-08-13T19:29:48+5:302020-08-13T19:31:09+5:30

मूर्तिकाराच्या निष्पाप मुलीचा प्रश्न 

Dad, if you had made a small idol of Ganesha too ...! | पप्पा, तुम्हीही लहान गणेश मूर्ती बनवल्या असत्या तर...!

पप्पा, तुम्हीही लहान गणेश मूर्ती बनवल्या असत्या तर...!

googlenewsNext
ठळक मुद्देमोठ्या मूर्ती बनविणारे मूर्तिकार आर्थिक संकटात सरकारने काहीतरी मार्ग काढण्याची अपेक्षा 

- रुचिका पालोदकर 

औरंगाबाद : पप्पा, तुम्हीही लहान गणेशमूर्ती बनविल्या असत्या, तर गणेशोत्सवात आपल्याकडेही पैसे  आले असते आणि आपणही मजा केली असती. बघा ना आपल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांकडे आता पैसे येणार आहेत. तुम्ही लहान मूर्ती का नाही बनविल्या, हा प्रश्न जेव्हा माझी लेकरं विचारतात, तेव्हा  त्यांच्या डोळ्यातील दु:ख पाहून आतडी पिळवटून निघतात, अशा शब्दांत मूर्तिकार दूधनाथ चव्हाण यांनी  त्यांची व्यथा मांडली. 

कोरोना आणि पर्यावरण ही कारणे दर्शवून शासनाने सार्वजनिक गणेश मंडळातील गणेशमूर्ती ४ फुटांपर्यंतच असतील, असा निर्णय जाहीर केला. यामुळे केवळ मोठ्या मूर्तीच बनविणारे मूर्तिकार आर्थिक संकटात सापडले आहेत. आमच्याकडच्या मूर्तीच विकल्या गेल्या नाहीत, तर आता पुढच्या गणेशोत्सवापर्यंत आमच्या पोटापाण्याची व्यवस्था सरकार पाहणार? की आम्हालाही एक लाखाची मदत जाहीर करणार आहे?  असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित  केला आहे. 

२५ वर्षांपासून चव्हाण सेव्हन हिल परिसरात गणेशमूर्ती तयार करण्याचे काम करतात. ६ फुटांपेक्षा उंच मूर्ती बनविणे ही त्यांची खासियत आहे. जिल्हा आणि बाहेरीलही अनेक गावांतील गणेश मंडळांकडूून त्यांना गणेशमूर्तींसाठी आॅर्डर येत असते. सध्या त्यांच्याकडे ४० ते ४५ गणेशमूर्ती तयार आहेत. एका गणेशमूर्तीची केवळ रंगरंगोटी करण्यासाठीच १,८०० ते २,५०० एवढा खर्च येतो. या सर्व मूर्तींसाठी त्यांनी आतापर्यंत अडीच ते तीन लाख रुपये गुंतविले आहेत. मूर्तींची विक्री झाली की कर्ज फेडायचे, हे मूर्तिकारांचे नेहमीचे गणित आहे; पण आता मात्र मूर्तीच विकल्या गेल्या नाहीत, तर कर्ज कसे फेडायचे  यामुळे ते हवालदिल झाले आहेत. दरम्यान बुधवारी चव्हाण यांची अभिजित देशमुख< बाळासाहेब औताडे आदी कार्यकर्त्यांनी भेट घेऊन यातून काही मार्ग काढण्याचे बोलून दाखविले.

मुलींकडे पाहून संयम ठेवला 
कुटुंबाचे पालनपोषण कसे करायचे, हा एक मोठा प्रश्न समोर उभा आहे. खूप विचार डोक्यात येतात; पण मी जर काही करून घेतले, तर माझ्या मुलींचे काय होणार, हा विचार करून शांत होतो. पोराच्या पायातले वाळे विकले आहेत. हातगाडी घेऊन दुसरा धंदा सुरू करावा, तर त्यासाठीही जवळ पैसे नाहीत,  असे चव्हाण  यांनी सांगितले. 

४ फुटांपेक्षा मोठ्या मूर्तींनीच कोरोना पसरणार का?
चार फुटांचीच गणेश मूर्ती बसविण्याचे धोरण जाहीर करण्यामागे सरकारचे काय अजब धोरण आहे, हे कळायला मार्ग नाही. चार फुटांपेक्षा  कमी आकाराच्या मूर्तींनीच कोरोना पसरणार आहे का? चार फूट असो किंवा ६, ८ फूट असो, ती उचलायला तेवढीच माणसे लागतात. एवढेच असेल, तर सोशल डिस्टन्सिंग पाळत मूर्ती मंडळापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी मी पार पाडतो, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Dad, if you had made a small idol of Ganesha too ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.