बाबा माफ करा! आंतरजातीय प्रेमविवाहानंतर मुलीची आत्महत्या,अंत्यसंस्काराकडे जन्मदात्यांची पाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 04:50 PM2022-04-13T16:50:41+5:302022-04-13T16:50:58+5:30
अल्पवयीन असताना मुलासोबत पळून गेली, पुन्हा घरी न जाता बालिक झाल्यास त्याचा मुलासोबत केला विवाह
औरंगाबाद : प्रेम हे आंधळं असतं असं म्हटलं जातं. प्रेमाखातर तिने चार वर्षांपूर्वी आई-वडिलांनाही नाकारल्याची जखम जन्मदात्यांच्या मनात रुजली. तिने नैराश्येतून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी कळवूनही तिच्या आई-वडिलांनी तिच्या प्रेताकडे पाठ फिरवल्याचा प्रकार मंगळवारी शहर पोलिसांनी अनुभवला.
पूजा आकाश खेडकर (२१, रा. विष्णूनगर) असे मृत तरुणीचे नाव आहे. याविषयी जवाहरनगर पोलिसांनी सांगितले की, पूजा ही वयाच्या १७ व्या वर्षी आकाशसोबत पळून गेली होती. ती अल्पवयीन असल्याने पोलिसांनी युगुलाला पकडून आणले, तिचे आई-वडील तिला घरी नेण्यासाठी आले. तेव्हा तिने आई-वडिलांकडे नाही, तर आकाशसोबत राहायचे असल्याचे सांगितले होते. ती अल्पवयीन असल्याने बाल न्याय मंडळाच्या आदेशाने पूजाला एक वर्ष सुधारगृहात ठेवले होते. ती १८ वर्षांची झाल्यानंतर त्यांनी २०१९ मध्ये प्रेमविवाह केला. आई-वडिलांनी तिच्याशी संबंध तोडले. लग्नानंतर दोघे विष्णूनगर येथे राहत होते.
आकाश बॅनर लावण्याचे काम करीत होता. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी तो कामानिमित्त घराबाहेर पडला. रात्री ३ वाजेच्या सुमारास तो घरी परतला, तेव्हा पूजाने घराचे दार आतून लावून घेतले होते. आवाज देऊनही ती प्रतिसाद देत नसल्याने जवाहरनगर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी दार तोडून पाहिले असता, पूजाने गळफास घेतल्याचे दिसले. तिला बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक घोरपडे तपास करीत आहेत.
रक्ताच्या नात्याने फिरवली पाठ
पूजाच्या मृत्यूची माहिती पोलिसांनी जाफराबाद तालुक्यात राहणाऱ्या तिच्या आई-वडिलांना कळविली. सायंकाळी तिचे मामा औरंगाबादला आले. पूजाचे आई-वडील येणार नसल्याचे आणि शव तिच्या पतीच्या ताब्यात देण्याचे त्यांनी सांगितल्याचे पोलिसांना सांगितले.
सुसाईड नोटमध्ये आई, वडील आणि पतीलाही सॉरी
पूजाने लिहिलेली सुसाईड नोट पाेलिसांना घटनास्थळी मिळाली. यात तिने आई-वडिलांची आणि पतीची माफी मागितली. ज्याच्यासाठी तुम्हाला सोडले, तोही आता पूर्वीसारखा राहिला नाही, अशी खंत तिने व्यक्त केली. तो त्याच्या नातेवाइकांसोबत राहतो. तुम्हीही नाते तोडल्याने एकटे वाटत असल्याचे तिने चिठ्ठीत नमूद केले. मृत्यूची घटना आई-वडिलांना कळवावी, मात्र ते येणार नाहीत, यामुळे आकाशनेच अग्निडाग द्यावा, अशी इच्छा तिने व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.