बाबा,आई झोपेतून उठली असेल घरी चला; मुलाच्या हट्टावर पत्नीचा खून करणारा निर्दयी बाप निरूत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 05:05 PM2022-06-01T17:05:41+5:302022-06-01T17:09:28+5:30
मुलाला चॉकलेट आणण्यासाठी गल्लीतील दुकानात पाठविल्यानंतर पत्नीचा गळा आवळून खून केला.
औरंगाबाद : ‘बाबा, आई झोपेतून उठली असेल, घरी चला’. त्या ४ वर्षीय चिमुरड्याचे हे बोल ऐकून दररोज मारामाऱ्या, खून, अपघात पाहून भावना बोथट झालेल्या खाकीतील पोलिसांची मनेही हेलावली. मुलाच्या या निरागस बोलण्यापुढे तो निर्दयी बाप निरूत्तर होता. त्या बालकाचा सांभाळ करण्यास नातेवाईकांनी नकार दिला. एका प्रेमकथेतून उमलू पाहणाऱ्या फुलास पोलिसांनी जड अंतकरणाने रात्री १.३० वाजता बालगृहात नेऊन सोडले.
चारित्र्याच्या संशयावरून पत्नी मधुराचा गळा आवळून खून केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी बालाजी वैजनाथ लोणीकर (रा. भानुदासनगर) यास अटक केली. मूळचे परळीचे (जि. बीड) रहिवासी असलेले मधुरा व बालाजीने ५ वर्षांपूर्वी पळून जाऊन आंतरजातीय प्रेमविवाह केला होता तेव्हापासून ते भानुदासनगरात भाड्याने खोली करून राहत होते. प्रेमविवाहामुळे हे दाम्पत्य नातेवाईकांपासून दुरावले होते. या दाम्पत्याला ४ वर्षांचा मुलगा पीयूष आहे.
गेल्या काही दिवसांपासून पत्नी मोबाईलवर कुणाशी तरी बोलते, ही बाब बालाजीला खटकत होती. त्यातून त्यांच्यात खटके उडत. सोमवारी दुपारीही त्यांच्यात वाद झाला तेव्हा पीयूषला चॉकलेट आणण्यासाठी गल्लीतील दुकानात पाठविल्यानंतर बालाजीने मधुराचा गळा आवळून खून केला. पीयूष घरी आला तेव्हा त्याने त्याला आई झोपल्याचे सांगितले. मुलास घेऊन तो पत्नीच्या मृतदेहाजवळ तासभर बसून होता. पोलीस तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी पीयूशला पोलीस ठाण्यात नेले.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटीत पाठविल्यानंतर पोलीस बालाजीला घेऊन ठाण्यात आले तेव्हा चिमुकला बापास जाऊन बिलगला आणि बाबा, आई झोपेतून उठली असेल घरी चला, असं सारखे म्हणू लागला. हे दृश्य पाहून पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची मने हेलावली. मुलाला कोणाकडे द्यावे, असा सवाल त्यांनी बालाजीला केला तेव्हा त्याने त्याला तीन मोठ्या बहिणी असून त्या सांभाळतील, असे सांगितले. पोलिसांनी त्याच्या तीन बहिणींना कॉल करून या घटनेची माहिती दिली. त्याच्या चार वर्षांच्या मुलाचा सांभाळ तुम्ही करावा, असे बालाजीचे म्हणणे आहे, असे पेालिसांनी त्यांना सांगितले, परंतु तिघींनीही पीयूषला सांभाळण्यास नकार दिला.
आईच्या नातेवाईकांचाही नकार
मधुराच्या आई-वडिलांना माहिती मिळाल्यानंतर ते औरंगाबादला आले. आमच्या मुलीचा ज्याने खून केला त्याच्या मुलाचा आम्ही सांभाळ करणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
शेवटी बालगृहात दाखल
पीयूषचा सांभाळ करण्यास नातेवाईक तयार नसल्याने शेवटी या चिमुकल्याला रात्री १.३० वाजता सिडको एन ३ येथील बालगृहात ठेवले. बालकल्याण समितीच्या आदेशाने या बाळाच्या संगोपनाची जबाबदारी दिली जाईल.