औरंगाबाद शहरातील रस्त्यांवर दुचाकी उचलताना दादागिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:51 AM2017-11-27T00:51:41+5:302017-11-27T00:51:52+5:30

रस्त्यांवरील आणि नो पार्किंगमधील उभी वाहने उचलगिरी करणा-या रोजंदारीवरील तरुण वाहनचालकांवर दादागिरी करून त्यांना मारहाण करीत असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीत हे तरुण मारहाण करीत असतात. वाहतूक नियमांचे पालन करणे प्रत्येक वाहनचालकाचे कर्तव्य आहे.

Dadagiri, while raising two-wheeler in the streets of Aurangabad city | औरंगाबाद शहरातील रस्त्यांवर दुचाकी उचलताना दादागिरी

औरंगाबाद शहरातील रस्त्यांवर दुचाकी उचलताना दादागिरी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : रस्त्यांवरील आणि नो पार्किंगमधील उभी वाहने उचलगिरी करणा-या रोजंदारीवरील तरुण वाहनचालकांवर दादागिरी करून त्यांना मारहाण करीत असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीत हे तरुण मारहाण करीत असतात.
वाहतूक नियमांचे पालन करणे प्रत्येक वाहनचालकाचे कर्तव्य आहे. महानगरपालिकेच्या आशीर्वादाने प्रमुख बाजारपेठ आणि रस्त्यांवरील पार्किंगच्या जागा बिल्डरांना देऊन टाकल्या. परिणामी शहरातील वाहन पार्किंगचा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला.
शहरातील वाहन पार्किंगसाठी जागाच शिल्लक नसल्याने वाहनचालकांना रस्त्यावरच वाहने उभी करण्याशिवाय पर्याय नसतो. कॅनॉट गार्डनसारख्या गर्दीच्या ठिकाणी खरेदीसाठी येणा-या नागरिकांची संख्या अधिक असल्याने वाहनांची संख्याही मोठी असते. तेथील पार्किंग आणि फुटपाथवर दुकाने थाटल्याने नागरिकांना रस्त्यांवरच वाहने उभी करावी लागतात. कॅनॉटमध्ये सिडको वाहतूक शाखेने सम आणि विषम तारखेच्या पार्किंगचे नियोजन केले. मात्र तेथे येणा-या प्रत्येक जणाला या पार्किंगची माहिती नसते. शिवाय यामुळे त्यांनी वाहने उभी करताना चूक केल्यास वाहतूक शाखेचे पोलीस ट्रक घेऊन येतात आणि वाहने उचलून नेतात.
अशाच प्रकारची वाहतूक व्यवस्था मुख्य शहर आणि टिळकपथ आदी ठिकाणी आहे. मात्र, सिडको एन-३, पुंडलिकनगर रोड, हेगडेवार रुग्णालय परिसर, गजानन महाराज मंदिर रोड या मार्गावर वाहन पार्किंगची व्यवस्थाच नाही. परिणामी नागरिक रस्त्याच्या शेजारी वाहने उभी करतात. ही वाहने उचलून नेणे आणि वाहनचालकांकडून कमीत कमी अडीचशे रुपये दंड वसूल करण्यासाठी वाहतूक विभागाच्या सिडकोत दोन, मुख्य शहरात तीन आणि छावणी विभागात दोन, अशी आठ वाहने फिरतात. यातील काही वाहने पोलिसांची, तर काही भाडेतत्त्वावर घेण्यात आली.
चारित्र्य पडताळणी नाही
वाहने उचलण्यासाठी मात्र तिन्ही विभागाने बेकायदेशीररीत्या गुंड प्रवृत्तीचे लोक कामाला ठेवले. कोणत्याही व्यक्तीला कामावर ठेवायचे असेल तर त्याची पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी करून घ्या, असे आवाहन पोलिसांकडून केले जाते.
जनतेला आवाहन करणारे शहर पोलीस विसरले. त्यांच्याकडे वाहने उचलणा-या एकाही कामगाराची चारित्र्य पडताळणी करण्यात आली नाही. सूत्रांनी सांगितले की, दुचाकी उचलण्याचे काम करणारे बहुतेक सर्व तरुण एक तर कमी शिकलेले आणि गुंड प्रवृत्तीचे आहेत.
मारहाणीला पोलिसांची मूकसंमती
वाहनचालकांना उचलेगिरी करणा-या तरुणांकडून मारहाण होते तेव्हा गाडीत बसलेले वाहतूक पोलीस बघ्याची भूमिका घेतात. त्यांच्या मूक संमतीमुळे वाहनचालकांना त्यांच्याकडून मारहाण होण्याच्या घटना वाढतात. सूत्राने सांगितले की, आधीच ते गुंड प्रवृत्तीचे असतात आणि पोलीस सोबत असल्याने आपले कोणीही वाकडे क रू शकत नाही, असे समजून ते वाहनचालकांना मारहाण करतात.
रोजंदारीसोबत बक्षीसही
भाडेतत्त्वावरील वाहनांवर गाडीमालकाने नियुक्त केलेल्या मजूर तरुणांना वाहनमालकांकडून तर पोलिसांच्या टेम्पोवर काम करणा-या तरुणांना रोज अडीचशे रुपये वेतन दिले जाते. या वेतनासोबतच अधिक दुचाकी उचलून आणल्या म्हणून त्यांना पोलीस कर्मचा-यांकडून रोख स्वरुपात दीडशे ते दोनशे रुपये अतिरिक्त बक्षिसी दिल्या जाते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
दोन दिवसांपूर्वी तरुणाला झोडपले
हेगडेवार रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बहिणीला भेटण्यासाठी गेलेल्या एका तरुणाने त्याची दुचाकी रुग्णालयाबाहेर उभी केली. तो रुग्णालयातून बाहेर आला तेव्हा त्याला त्याची दुचाकी वाहतूक पोलीस उचलत असल्याचे दिसले. पळत जाऊन त्याने दुचाकी न उचलण्याची विनंती केली. मात्र, उचलेगिरी करणा-या दोन तरुणांनी त्याला बेदम मारहाण करून गाडी उचलून नेली. अशाच घटना कॅनॉट गार्डन परिसरात अनेकदा वाहनचालकांनी अनुभवल्या.

Web Title: Dadagiri, while raising two-wheeler in the streets of Aurangabad city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.