अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:17 AM2017-07-22T00:17:59+5:302017-07-22T00:21:24+5:30
परभणी : राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मानधन वाढवून द्यावे या प्रमुख मागणीसाठी २१ जुलै रोजी परभणीत महिलांनी धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मानधन वाढवून द्यावे या प्रमुख मागणीसाठी २१ जुलै रोजी परभणीत महिलांनी धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
आयटक संलग्न असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस संघटनेच्या वतीने माधुरी क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी सकाळी ११ वाजता आंदोलनाला प्रारंभ झाला. राज्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधन वाढीसाठी दोन वर्षांपूर्वी समिती गठीत झाली आहे. मात्र अद्यापही ५ हजार रुपये एवढ्या तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. विशेष म्हणजे, इतर राज्यात महाराष्ट्रापेक्षा अधिक मानधन अंगणवाडी सेविकांना दिले जाते. महाराष्ट्रातही वाढ द्यावी यासाठी एप्रिल महिन्यात मुक्कामी आंदोलन केले होते, त्यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित केले होते. मात्र मानधन वाढीविषयी निर्णय होत नसल्याने आयटकच्या वतीने मराठवाड्यात हे आंदोलन केले जात असल्याचे माधुरी क्षीरसागर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, सेवा ज्येष्ठता आणि शैक्षणिक पात्रतेनुसार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मानधन वाढवून द्यावे, अशी आमची मागणी आहे. तसेच मुलांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराचा दर्जा चांगला असावा, यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
एक ते दीड तास धरणे आंदोलन केल्यानंतर महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले. माधुरी क्षीरसागर यांच्यासह गंगा जाधव, सीमा देशमुख, सुनीता धनले, आशा गाडे, राजश्री गाडे, अर्चना कुलकर्णी, सविता ढाले आदींसह जिल्हाभरातील सुमारे ३०० महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.