जागतिक धम्म परिषदेत दलाई लामा यांची धम्मदेसना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 02:14 AM2019-11-21T02:14:15+5:302019-11-21T02:14:24+5:30
जागतिक धम्म परिषदेचे प्रमुख आकर्षण हे जागतिक कीर्तीचे बौद्ध धम्म गुरू, शांततेचे नोबेल पुरस्कार विजेते पूज्य भदन्त दलाई लामा हे आहेत
औरंगाबाद : या जागतिक धम्म परिषदेचे प्रमुख आकर्षण हे जागतिक कीर्तीचे बौद्ध धम्म गुरू, शांततेचे नोबेल पुरस्कार विजेते पूज्य भदन्त दलाई लामा हे आहेत. त्यांच्यासह अखिल भारतीय भिक्खू संघाचे संघानुशासक पूज्य भदन्त सदानंद महास्थवीर, श्रीलंकेचे महानायका महाथेरो डॉ. वरकगोडा, भदन्त बोधिपालो महाथेरो (लोकुत्तरा), भदन्त चंदिमा (सारनाथ), भदन्त मैत्री महाथेरो (नेपाळ), भदन्त संघदेसना (लडाख), भदन्त शिवली (श्रीलंका), भदन्त वॉनसन साऊथ (कोरिया), भदन्त प्रधामबोधिवाँग, भदन्त प्रहमा केयरती श्रीउथाना (थायलंड), भदन्त पीच सेम (कम्बोडिया) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यासह अनेक मान्यवर विचारवंतही येत आहेत.
शनिवारी व रविवारी पहाटे ६ ते ८ वाजेपर्यंत पीईएसच्या मैदानावर विपश्यना होईल. ज्येष्ठ भदन्त विनय रखित्ता हे उपासक- उपासिकांना विपश्यनेचा सप्रयोग अर्थ उलगडून दाखवतील.
शनिवारी सकाळी ९ ते १२ या वेळेत चौका येथील लोकुत्तरा महाविहारात दलाई लामा यांच्या उपस्थितीत फक्त बौद्ध भिक्खूंसाठी संवाद सत्र होणार आहे. दुपारी १ ते सायंकाळी ५ या वेळेत ‘बौद्ध संस्कृती आणि जीवन जगण्याचा मार्ग’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. सायंकाळी ५.३० ते रात्री ९.३० या वेळेत ‘बुद्धाने दिलेली शिकवण’ याचे विवेचन व विश्लेषण जगभरातून आलेले ज्येष्ठ भिक्खू करणार आहेत. हे दोन्ही परिसंवाद व चर्चा पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या सभागृहात होणार असून, ते सर्वांसाठी खुले आहे.
रविवारी सकाळी दलाई लामा यांची धम्मदेसना
रविवारी पहाटेच्या विपश्यनेनंतर सकाळी ९.३० वाजता आदरणीय दलाई लामा यांची धम्मदेसना होणार आहे. दुपारी १ वाजेपासून ३ वाजेपर्यंत युवकांसाठी एक सत्र होणार आहे. दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत उपासक -उपासिका व त्यांच्या कुटुंबासाठी एक स्वतंत्र सत्राचे आयोजन केले आहे. ५.३० वाजता परिषदेचा सांगता समारंभ होईल.