दलित वस्तीचे नियोजन वादात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2016 12:06 AM2016-03-17T00:06:55+5:302016-03-17T00:11:40+5:30
नांदेड: मनपाच्या वतीने केलेले दलित वस्तीचे नियोजन नव्याने करावे, अशी मागणी मनपा विरोधी पक्षनेते प्रमोद खेडकर यांनी केली आहे.
नांदेड: मनपाच्या वतीने केलेले दलित वस्तीचे नियोजन नव्याने करावे, अशी मागणी मनपा विरोधी पक्षनेते प्रमोद खेडकर यांनी केली आहे. त्याचवेळी महापौर शैलजा स्वामी यांनी मात्र फेरनियोजन कशाचे? असा प्रश्न करीत या मागणीला केराची टोपली दाखविली़
५ जानेवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत गोंधळाच्या वातावरणात विषयपत्रिकेतील ठराव क्र. १०९ अनुसार १० कोटी ६० लाख रुपयांचा दलित वस्ती सुधार योजनेतून कामे घेण्याचा ठराव घेण्यात आला होता. या निधीच्या दीडपट नियोजनाद्वारे शहरात दलित वस्ती कामांचे नियोजन करण्यात आले आहे. जवळपास विविध प्रभागांतील १०८ कामांना मान्यता दिल्याची यादी महापौरांनी प्रसिद्ध केले आहे. या यादीवर आक्षेप घेताना विरोधी पक्ष नेते खेडकर यांनी चर्चेविना झालेला ५ जानेवारीचा ठराव क्र. १०९ रद्द करण्याची मागणी केली आहे. या ठरावावर चर्चा झाली नाही. त्यामुळे आवश्यक त्या प्रभागात दलित वस्तीची कामे होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. परिणामी हा ठराव रद्द करुन पुन्हा एकदा योजनेच्या निधीचे नियोजनाची मागणी त्यांनी आयुक्ताकडे केली आहे. यासंदर्भात महापौर स्वामी यांनी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सुचविलेली कामे नियमानुसारच असून फेरनियोजनाचा प्रश्नच नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे आगामी सभेत हा मुद्दा गाजण्याची चिन्हे आहेत.