वन्य प्राण्यांकडून कोवळ्या पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:04 AM2021-07-26T04:04:12+5:302021-07-26T04:04:12+5:30
दुधड : दोन वर्षांपासून त्रस्त असलेल्या दुधड परिसरातील शेतकऱ्यांच्या यंदा सुरुवातीला पाऊस चांगला असल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत. पेरणी ...
दुधड : दोन वर्षांपासून त्रस्त असलेल्या दुधड परिसरातील शेतकऱ्यांच्या यंदा सुरुवातीला पाऊस चांगला असल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत. पेरणी केलेले पीक जोमात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. तोच या कोवळ्या पिकांवर निलगायी, रानडुक्कर आदी वन्यप्राणी धुडगूस घालीत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
याबाबत दुधड शिवारातील शेतकऱ्यांनी वनविभागाला वारंवार माहिती दिली. परंतु त्यांच्याकडून दखल घेतली जात नाही. यासंबंधी शेतकऱ्यांनी राजकीय पुढाऱ्यांकडे निवेदनाद्वारे कैफियत मांडली. माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. तांबे यांना खडसावले. नागरिकांच्या समस्या सोडवा, अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक होईल. असे सुचविल्यावर वनविभागाला उशीरा का होईना जाग आली आहे. वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
वनविभागाकडून आवाहन
शनिवारी वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. तांबे यांनी पथकासह दुधड शिवारात नुकसान झालेल्या शेतशिवाराची पाहणी केली. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी वनविभागाकडे अर्ज करण्याचे आवाहन केले. यावेळी बाबासाहेब चौधरी, किशोर चौधरी, विनायक चौधरी, शिवाजी चौधरी, शिवनाथ चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, सुदाम घोडके, वनपाल एस. बी. पुंड, वनरक्षक के. पी. शिंदे, ए. टी. भागवत, एस. एम. गोराडे आदींची उपस्थिती होती.