पिकांची नासाडी, डोक्यावर कर्ज..तणावात असलेल्या शेतकऱ्याचा हृद्यविकाराने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 06:47 PM2019-11-04T18:47:47+5:302019-11-04T18:49:30+5:30
शेतीला व चाऱ्याला फटका बसल्याने उत्पन्न मिळणार नाही. यामुळे कर्ज कसे फिटेल आणि मुलीचे लग्न कसे होईल याच्या विवंचनेत ते होते.
सिल्लोड/ भराडी: अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांची नासाडी झाली, जनावरांसाठी असलेला चारा ही सडून गेला, त्यात डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने तणावात असलेल्या एका शेतकऱ्याचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथे घडली. कृष्णा एकनाथ काकडे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
तालुक्यात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. यामुळे शेतीला मोठा फटका बसला आहे. पेरलेला मका व कापूस पिके पूर्णतः उध्वस्त झाले आहेत. पिके तर गेली त्यासोबतच जनावरांसाठीचा चार सुद्धा नष्ट झाला आहे. कृष्णा काकडे हे यामुळे तणावात होते. त्यांच्याकडे 2 गाई व 2 वासरू होते. दूध विकून ते घरचा प्रपंच चालवत होते. मात्र चारा नसल्याने दुध व्यवसायावर परिणाम झाला होता. तसेच त्यांचाकडे खाजगी सावकाराचे 80 हजार रुपये कर्ज होते.
शेतीला व चाऱ्याला फटका बसल्याने उत्पन्न मिळणार नाही. यामुळे कर्ज कसे फिटेल आणि मुलीचे लग्न कसे होईल याच्या विवंचनेत काकडे होते. यातच त्यांना आज सकाळी हृद्य विकाराचा तीव्र झटका आला आणि ते गतप्राण झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. सिल्लोड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले आले. शोकाकुल वातावरणात धानोरा येथील शेतवस्तीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सिल्लोड तालुक्यात अतिवृष्टी व पिकांची नासाडी यामुळे 10 दिवसात 3 शेतकऱ्यांचा जीव गेला आहे.