कोबीच्या निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्याचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:05 AM2021-04-03T04:05:11+5:302021-04-03T04:05:11+5:30
तालुक्यातील नेवपूर येथील शेतकरी प्रशांत भाऊसाहेब देशमुख-सोळुंके यांनी मुंडवाडी येथील अंकुर रोपवाटिकेतून एका कंपनीची १४ हजार रोपे ...
तालुक्यातील नेवपूर येथील शेतकरी प्रशांत भाऊसाहेब देशमुख-सोळुंके यांनी मुंडवाडी येथील अंकुर रोपवाटिकेतून एका कंपनीची १४ हजार रोपे खरेदी करून एक एकर शेतात लागवड केली. त्यांनी नियमितपणे वेळोवेळी पाणी खतांची मात्रा, औषध फवारणी केली. मात्र या रोपांची सुरुवातीपासून म्हणावी तशी वाढ झाली नाही तसेच फ्लाॅवर पिसाऱ्यासारखी सरळ वाढून फिंजारल्यासारखी झाली आहे. सर्वच्या सर्व पिकाची ही परिस्थिती केवळ बोगस बियाणामुळे झाल्याने सदर शेतकऱ्याने रोपे जेथून खरेदी केली होती, त्या अंकुर रोपवाटिकेशी संपर्क साधून याविषयी माहिती दिली. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आम्ही रोपे तयार करतो सदरील जबाबदारी कंपनीची आहे. कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला असता त्यांच्या प्रतिनिधींनी पिकाची पाहणी करून केवळ औपचारिकता पूर्ण केली. रोपवाटिका व कंपनीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने या शेतकऱ्याने
कृषी विभागाकडे तक्रार करून संबंधित कंपनीवर कार्यवाही करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. त्यानुषंगाने तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक, पं.स.चे तालुका कृषी अधिकारी दिनकर जाधव यांनी भेट देऊन कोबी पिकाचा पंचनामा केला. सदर शेतकऱ्याला रोपांसह लागवड खर्च असा एकूण ७० हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे, तसेच आजच्या बाजारभावानुसार दीड लाखाचे उत्पन्न अपेक्षित होते. बोगस बियाणांमुळे हे पीक हातचे गेले असून शेतकरी संकटात सापडला आहे.
कोट
आम्ही पाहणी करून पिकाचा पंचनामा केला आहे. बियाणांमध्ये दोष असल्यामुळे पिकाची वाढ झाली नाही. त्यामुळे हे पीक खराब निघाले आहे. याचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला सादर केला जाईल. त्यांच्या निर्देशानुसार पुढील कारवाई केली जाईल.
-बाळराजे मुळीक, तालुका कृषी अधिकारी
फोटो : नेवपूर येथील शेतकरी प्रशांत देशमुख- सोळुंके यांच्या शेतातील कोबी पिकाची पाहणी करताना तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक, पं.स. तालुका कृषी अधिकारी दिनकर जाधव आदी.
२) कोबीचे फिंजारलेले रोप