आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील बोर्डचे नुकसान; माथेफिरू ताब्यात, पोलिसांचे शांततेचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 20:08 IST2025-01-23T20:05:58+5:302025-01-23T20:08:00+5:30
या प्रकरणातील माथेफिरू ताब्यात असून कोणीही अफवेस बळी पडू नये, सर्वांनी शांतता राखण्याचे पोलिसांचे आवाहन

आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील बोर्डचे नुकसान; माथेफिरू ताब्यात, पोलिसांचे शांततेचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर:डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ लावण्यात आलेल्या डिजिटल बोर्डचे एका माथेफिरूने नुकसान केल्याची घटना आज, गुरुवारी सायंकाळी ५. ३० वाजता घडली. महेश मुरलीधर कांबळे असे माथेफिरूचे नाव असून पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे.
विद्यापीठ गेटसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. त्याच्या खाली 'The Symbol of Knowledge - Dr. B. R. Ambedkar' असा डिजिटल बोर्ड लावण्यात आलेला आहे. आज सायंकाळी एक माथेफिरू या परिसरात रेंगाळत होता. प्रत्यक्षदर्शीनुसार हा माथेफिरू पहिल्यांदा एका मुलीच्या मागे चाकू घेऊन लागला होता. मुलीने मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर त्याने अचानक पुतळ्याकडे मोर्चा वळवला. पुतळ्याखालील डिजिटल बोर्डमधील अक्षर चाकूने तोडण्याचा प्रयत्न करत नुकसान केले.
हे निदर्शनास येताच पुतळा परिसरात जमाव जमला. यावेळी संतप्त जमावाने माथेफिरूस चांगलाच चोप दिला. माहिती मिळताच उपायुक्त नितीन बगाटे, सहायक आयुक्त संपत शिंदे, निरीक्षक मंगेश जगताप, शेषराव खटाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी माथेफिरूस ताब्यात घेतले. या माथेफिरुचे नाव महेश मुरलीधर कांबळे (३६, रा. बेगमपुरा, लालमंडी) असून, त्याच्यावर मानसिक परिणाम झाल्याचे आणि तो नशेच्या आहारी गेल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले. आता परिस्थिती नियंत्रणात असून कोणीही अफवेस बळी पडू नये, सर्वांनी शांतता बाळगावी असे, आवाहन पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी केले आहे.
पुण्यात उपचार, आई, भावाला मारहाण
महेशने ४:३० वाजता घरात पहिले आई, भावाला मारहाण केली. त्याची आई ही तक्रार करण्यासाठी बेगमपुरा ठाण्यात गेली. त्याच दरम्यान महेशने हे कृत्य केले. महेशची पत्नी त्याला सोडून गेली आहे. तो मनोरुग्ण असून त्याच्यावर काही दिवस पुण्यात देखील उपचार करण्यात आल्याचे कुटुंबाने पाेलिसांना सांगितले. दरम्यान, रात्री नागराज गायकवाड यांच्या तक्रारीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. जखमी महेशला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे निरीक्षक मंगेश जगताप यांनी सांगितले.