मराठवाड्यातील धरणांनी गाठला तळ; जायकवाडी प्रकल्पात उरला फक्त ६ टक्के जलसाठा

By बापू सोळुंके | Published: May 18, 2024 07:21 PM2024-05-18T19:21:22+5:302024-05-18T19:22:54+5:30

चिंता वाढली! जुलैपर्यंतच पुरेल एवढाच जलसाठा जायकवाडीत शिल्लक

Dams in Marathwada hit rock bottom; Only 6 percent of the water reserve is left in the Jayakwadi project | मराठवाड्यातील धरणांनी गाठला तळ; जायकवाडी प्रकल्पात उरला फक्त ६ टक्के जलसाठा

मराठवाड्यातील धरणांनी गाठला तळ; जायकवाडी प्रकल्पात उरला फक्त ६ टक्के जलसाठा

छत्रपती संभाजीनगर: पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाची आता सन २०१८ सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. जायकवाडी प्रकल्पात आज केवळ ६ टक्के जलसाठा उरला आहे. जुलैपर्यंतच पुरेल एवढाच जलसाठा जायकवाडीत शिल्लक असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

मराठवाड्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून पैठण येथील जायकवाडी धरण ओळखले जाते. जायकवाडी प्रकल्पावरच छत्रपती संभाजीनगर, जालना शहराची तहान भागविली जाते. यासोबतच या दोन्ही जिल्ह्यातील एमआयडीसी आणि साखरकारखानेही जायकवाडी प्रकल्पावर चालतात. अशा या महत्वपूर्ण प्रकल्पात आज केवळ ६ टक्के जिवंत जलसाठा उरला आहे. गतवर्षी मराठवाड्यासह जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्व भागातही कमी पाऊस पडला होता. यामुळे गतवर्षी जायकवाडी प्रकल्पात ५२ टक्के जलसंचय झाला होता. यासोबतच वाढत्या उन्हामुळे या प्रकल्पातील पाण्याचे बाष्पिभवन होण्याचे प्रमाणही वाढल्याने धरणातील जलसाठा झपाट्याने कमी होत आहे.

जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज या प्रकल्पात असलेला जलसाठा जुलैअखेरपर्यंतच पुरेल इतकाच आहे. अशीच परिस्थिती सन २०१८ मध्ये उदभवली होती. १८ मे २०१८ रोजी या प्रकल्पात उणे ५ टक्के जलसाठा होता. याविषयी जायकवाडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव म्हणाले की, जायकवाडी प्रकल्पात आज ६ टक्के जिवंत जलसाठा आहे. असे असले . विद्यमान पाण्याचा वापर लक्षात घेता हा जलसाठा ३१ जुलैपर्यंत पुरू शकतो. हा साठा संपल्यानंतरही आपण मृत साठ्यातील पाण्याचा वापर करू शकतो. यामुळे पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही.

मराठवाड्यातील अन्य प्रकल्पही तळाला
जायकवाडीशिवाय मराठवाड्यात अन्य १० मोठे प्रकल्प आहेत. यातील माजलगाव, सिद्धेश्वर,निम्न तेरणा आणि सिना कोळेगाव या मोठ्या धरणाचा जिवंत जलसाठा शून्यावर आला आहे. तर बीडमधील मांजरा आणि परभणी जिल्ह्यातील निम्न दुधना प्रकल्पात केवळ १ टक्के जिवंत पाणीसाठा उरला आहे. उर्वरित प्रकल्पापैकी येलदरीमध्ये २९ टक्के, उर्ध्व पेनगंगा ३६ टक्के, निम्न मनार प्रकल्पात २५ टक्के, विष्णूपुरी २६ टक्के जलसाठा आज शिल्लक आहे.

Web Title: Dams in Marathwada hit rock bottom; Only 6 percent of the water reserve is left in the Jayakwadi project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.