तरुणाईला दांडियाचे वेध! युवतींमध्ये यंदा पुष्पा अन् झमकुडी घागऱ्यांचा ट्रेण्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 07:50 PM2024-09-30T19:50:45+5:302024-09-30T19:51:06+5:30
गुजरातहून तीन हजार नवीन घागरे शहरात दाखल
छत्रपती संभाजीनगर : देवीची आराधना करण्याचा काळ म्हणजे नवरात्रोत्सव होय. तरुणाईला वेध लागले ते रंगीलो दांडिया उत्सवाचे. यासाठी खास परिधान केले जाणारे नवीन घागऱ्यात यंदा ‘पुष्पा’ व ‘झमकुडी’ घागऱ्याचा ट्रेण्ड असून, युवतींमध्ये त्याची क्रेझ आहे.
गुजरातहून तीन हजार नवीन घागरे शहरात दाखल
गुजरात राज्यातील अहमदाबाद, सुरत, राजकोट येथून नवीन तीन हजार घागरे शहरात दाखल झाले आहेत. हे घागरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय भाड्याने घागरे घेण्याची परंपरा कायम असून, यासाठी सात हजार घागरे आधीचे आहेच.
१२ मीटर घेर असलेला पुष्पा घागरा
बाजारात आलेल्या पुष्पा घागराचे वैशिष्ट्य असे आहे की, याचा घेर १२ मीटरचा आहे. यास हाफ-हाफ घागरा असेही म्हणतात. कारण, यात घागऱ्याची अर्धी बाजू डिझाईनर तर अर्धी बाजू प्लेन असते.
आडव्या कळीचा झमकुडी घागरा
‘झमकुडी’ घागऱ्याचा घेर ७ मीटर असतो. घागरा, सिव्हलेस ब्लाउज त्यावर फुल सिव्हलेस जॉकेट असते. कॉटन कपड्यावर वर्क केलेले असते. याचे वैशिष्ट्य म्हणजे इतर घागरे उभ्या कळीचे असतात, तर झमकुडी घागऱ्याला आडव्या कळी असतात.
पाँचो कफतान घागरा
ज्या महिला, तरुणी लठ्ठ आहे. त्यांच्यासाठी ‘पाँचो कफतान’ घागरा आला आहे. प्लेन घागरा, खाली बॉडर (आजरग, पटोला प्रिंटची बॉडर) असलेला घागरा शोभून दिसतो. या घागऱ्यात लठ्ठपणा दिसून येत नाही.
शेवटच्या चार दिवसात दररोज दीड हजार घागरे जातात भाड्याने
नवरात्रोत्सात सुरुवातीचे पाच दिवस शहरात २०० ते २५० घागरे भाड्याने जातात, तर शेवटचे चार दिवस हजार ते दीड हजारपेक्षा अधिक घागरे भाड्याने जातात. भाड्याने देण्यात येणारे घागरे त्यांची किंमत दोन हजार ते सात हजार रुपयांदरम्यान असते. हे घागरे डिझाइनर असतात. हे घागरे ५०० ते २ हजार रुपये भाड्याने मिळतात.
- योगेश मालाणी, व्यापारी