बर्ड फ्ल्यूचा धोका ! सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय राहणार आणखी काही दिवस बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 08:26 PM2021-01-12T20:26:28+5:302021-01-12T20:28:04+5:30
नॅशनल इंस्टिटयुट ऑफ हाय सेक्युटिरी अॅनिमल डिसीजेसचे महापालिकेला प्राणिसंग्रहालय बंदच ठेवण्याचे आदेश
औरंगाबाद : देशभरातील नऊ राज्यांत बर्ड फ्ल्यूने थैमान घालायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातही या आजाराने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. बर्ड फ्ल्यूपासून सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील प्राणी सुरक्षित राहावेत म्हणून ते आणखी काही दिवस बंद ठेवण्याचा आदेश सोमवारी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सेक्युरिटी अॅनिमल डिसीजेस विभागाने दिला.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने यापूर्वीच प्राणिसंग्रहालय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने सिध्दार्थ उद्यान प्राणिसंग्रहालय सुरु केलेले नाही. त्यातच बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव वाढत असून हा बर्ड फ्ल्यूचा विषाणू हवेतून पसरत असल्याने त्याचा सर्वाधिक धोका प्राण्यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बर्ड फ्ल्यूच्या रोगामुळे कोंबडया, झाडावरील पक्षांचा मृत्यु होत आहे. त्यामुळे प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना राबविण्याच्या सूचना मनपा प्रशासनाला करण्यात आल्या आहेत. महापालिकेचे पशुसंवर्धन अधिकारी तथा प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस.नाईकवाडे म्हणाले की, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सेक्युरिटी अॅनिमल डिसीजेस संस्थेने परिपत्रक काढून बर्ड फ्ल्यू ला रोखण्यासाठी प्राणिसंग्रहालय बंद ठेवण्यात यावे, असे आदेश दिले आहेत.
तसेच प्राण्यांना मांसाहार देतांना मिठाच्या पाण्यात अर्धातास मांस ठेवून धूऊन स्वच्छ करुन देण्यात यावा, पशु वैद्यकीय तज्ञांमार्फत प्राण्यांची नियमित तपासणी करण्यात यावी, प्राण्यांचा इतर प्राण्यांशी संपर्क येऊ देऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या राहण्याच्या जागेत पक्षांनी येऊ नये याकरिता बुजगावणे बसविण्यात आले आहे. तसेच प्राणिसंग्रहालय बंद ठेवण्यात येत असून त्यामध्ये कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सेक्युरिटी अॅनिमल डिसीजेस संस्थेचे प्राणिसंग्रहालय सूरू करण्याचे आदेश प्राप्त होत नाही, तो पर्यंत प्राणिसंग्रहालय बंद राहणार असल्याचे डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी सांगितले.