कानांना बुरशी, बॅक्टेरियाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:05 AM2021-06-25T04:05:32+5:302021-06-25T04:05:32+5:30
औरंगाबाद : सतत पावसात भिजल्यानंतर कानात ओलसरपणा राहिल्यास किंवा अन्य कारणांनी कानांना बुरशी, बॅक्टेरियाचा धोका निर्माण होतो. त्यामुळे बहिरेपणाला ...
औरंगाबाद : सतत पावसात भिजल्यानंतर कानात ओलसरपणा राहिल्यास किंवा अन्य कारणांनी कानांना बुरशी, बॅक्टेरियाचा धोका निर्माण होतो. त्यामुळे बहिरेपणाला सामोरे जाण्याची वेळ ओढावू शकते. पण, घाबरू नका. या बुरशीचा आणि म्युकरमायकोसिसचा काडीचाही संबंध नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराला सामोरे जावे लागत आहे. मात्र, दरवर्षी पावसाळ्यात अनेकांना कानाच्या बुरशीच्या त्रासाला सामोरे जावे लागते. सुदैवाने ही बुरशी फक्त कानापुरतीच मर्यादीत राहाते. शरीराच्या अन्य कोणत्याही भागाला त्याचा कुठलाही त्रास होत नाही. परंतु कान म्हणजे माणसाचे ऐकू येण्याचे यंत्र आहे. या यंत्राला काही त्रास झाला, तर त्याचा सरळ परिणाम ऐकू येण्याच्या क्षमतेवर होतो. बुरशी, बॅक्टेरियामुळे कान दुखतो व कमी ऐकू येणे किंवा बहिरेपणाला सामोरे जाण्याची वेळ ओढावू शकते.
------
म्युकरमायकोसिसचा संबंध नाही
कानातील बुरशीचा आणि म्युकरमायकोसिसचा काहीही संबंध नाही. पावसाळ्यात नेहमीच अनेकांना कानांना संसर्ग होत असतो. ही साधी बुरशी असते. ती शरीराच्या आतमध्ये जात नाही. सर्दी, खोकला होतो, तेव्हाही काहींमध्ये संसर्ग कानात जातो.
- डाॅ. वसंत पवार, सहयोगी प्राध्यापक, कान-नाक-घसा विभाग, घाटी
--
रोज ५ ते ७ रुग्ण
कानांना बुरशीमुळे होणाऱ्या त्रासाचे रुग्ण हे दरवर्षी येतात. सध्या ओपीडीत रोज ५ ते ७ रुग्ण येत आहेत. कानात ओलसरपणा राहणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. कानात काडी घालता कामा नये.
- डाॅ. अतुल पोरे, कान - नाक - घसातज्ज्ञ
---
काय घ्याल काळजी ?
- पावसात भिजल्यानंतर, आंघोळ केल्यानंतर कानात ओलसरपणा राहतो. कान कोरडे करण्याकडे दुर्लक्ष होते. परंतु कानात ओलसरपणा राहणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.
- कानात कोणत्याही कारणासाठी काडी घालता कामा नये. हेडफोन वापरताना त्याचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण केले पाहिजे. इतरांचे हेडफोन वापरणे शक्यतो टाळावे.
------
पावसाळ्यात ओल्याव्यामुळे धोका
१) पावसात सतत भिजल्यामुळे कानांना बुरशीचा, बॅक्टेरियाचा धोका वाढतो. अशावेळी कानात पू होणे, कान गच्च होणे, सतत दुखणे असा त्रास होतो.
२) वेळीच उपचार घेण्याकडे दुर्लक्ष केल्यास कमी ऐकू येणे, बहिरेपणा येणे, कानाचा पडदा फाटणे, असा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे कानाचे कोणतेही दुखणे अंगावर काढता कामा नये.