आघाडीसाठी धोक्याची घंटा

By Admin | Published: May 19, 2014 11:54 PM2014-05-19T23:54:14+5:302014-05-20T00:06:16+5:30

हिंगोली : हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीत हिंगोली व वसमत विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाल्याने येथील काँग्रेस व राष्टÑवादीच्या आमदारांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

Danger hour for lead | आघाडीसाठी धोक्याची घंटा

आघाडीसाठी धोक्याची घंटा

googlenewsNext

हिंगोली : हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीत हिंगोली व वसमत विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाल्याने येथील काँग्रेस व राष्टÑवादीच्या आमदारांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. त्यामुळे येथील आमदारांना आत्मपरिक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. हिंगोली विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व गेल्या पंधरा वर्षांपासून काँग्रेसचे आ.भाऊराव पाटील गोरेगावकर करीत आहेत. लोकसभा निवडणुकीत या मतदार संघातून काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीचे उमेदवार राजीव सातव यांना मताधिक्य मिळणे अपेक्षित असताना शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांना एकूण १० हजार ९३३ मतांचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीकरीता काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे आता कुठे चुका झाल्या, याचे आत्मपरिक्षण आ. गोरेगावकर व काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना करावे लागणार आहे. स्वत: आ.गोरेगावकर यांच्या गोरेगाव या गावात सातव यांना केवळ १ हजार ६६७ मते मिळाली. तर वानखेडे यांना २ हजार ३४६ मते मिळाली. दुसरीकडे हिंगोली विधानसभा मतदार संघातून गेल्या वेळी भाजपाकडून निवडणूक लढविलेले भाजपाचे तान्हाजी मुटकुळे यांनी त्यांच्या आडगाव या गावातून वानखेडे यांना ४७७ मते मिळून दिली. येथे सातव यांना ३८६ मते मिळाली. त्यामुळे मुटकुळे यांनी या क्षणी तरी महायुतीच्या उमेदवारास जास्तीचे मते मिळवून देऊन आपली उमेदवारीची दावेदारी पक्की केली आहे. वसमत विधानसभा मतदार संघातही अशीच काहीशी स्थिती आहे. या मतदार संघाचे नेतृत्व गेल्या १० वर्षांपासून राष्टÑवादीचे आ.जयप्रकाश दांडेगावकर करीत आहेत. या मतदार संघातून शिवसेनेला ९ हजार ९१ मतांची आघाडी मिळाली आहे. आ. दांडेगावकर यांचे दांडेगाव हे गाव कळमनुरी विधानसभा मतदार संघात येते. या गावातून मात्र आ. सातव यांना तब्बल ८२९ मते मिळाली आहेत. तर वानखेडे यांना ३५६ मते मिळाली आहेत. असे असले तरी राजकारणात अत्यंत मुरब्बी समजल्या जाणारे आ.दांडेगावकर यांनाही आत्मचिंतन करण्याची गरज आहे. त्यांचे प्राबल्य असलेल्या अनेक गावांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारास मताधिक्य मिळाले आहे. दुसरीकडे शिवसेनेचे माजीमंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी मात्र त्यांच्या पांगरा शिंदे या गावात वानखेडे यांना ९५९ मते मिळवून दिली. या गावात सातव यांना ८०२ मते मिळाली. डॉ. मुंदडा हेही मतांच्या राजकारणात तरबेज समजल्या जातात. त्यांनी वानखेडे यांना अधिकची मते मिळवून देऊन राष्टÑवादीच्या गोटात खळबळ उडवून दिली आहे. कळमनुरी विधानसभा मतदार संघात मात्र राजीव सातव यांनी स्वत: कौशल्य पणाला लावीत तब्बल २० हजार ८८ मतांची आघाडी मिळविली. शिवाय त्यांच्या मसोड या गावात त्यांना तब्बल १ हजार १४ मते मिळाली. तर वानखेडे यांना केवळ ५३ मते मिळाली. याशिवाय सातव यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या अनेक गावांमध्ये जोरदार मते मिळविली. दुसरीकडे शिवसेनेचे माजी आ. गजाननराव घुगे यांनी त्यांच्या हिंगणी या गावातून वानखेडे यांना ६६७ मते मिळवून दिली. तर या गावात सातव यांना केवळ ३६५ मते मिळाली. त्यामुळे घुगे यांचीही उमेदवारीची दावेदारी पक्की मानली जात आहे. राष्टÑवादीचे माजी खा. अ‍ॅड. शिवाजीराव माने यांनी या निवडणुकीत आघाडी धर्म बाजूला ठेवून शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांचा जाहीर प्रचार केला. त्यांच्या कान्हेगाव या गावातून शिवसेनेला तब्बल ५५५ मते मिळाली. तर सातव यांना १३६ मते मिळाली. अ‍ॅड. माने यांनी कळमनुरी विधानसभेची निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली असल्याचे समजते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत येथून काँग्रेसकडून कोण निवडणूक लढविणार? याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. सद्यस्थितीत आदिवासी युवक कल्याण संघाचे राज्याध्यक्ष डॉ. संतोष टारफे, जि.प. सदस्य बाबा नाईक यांनी उमेदवारी मिळविण्याच्या दृष्टिकोणातून तयारी सुरू केली आहे. दरम्यान, देशभरात ज्या पद्धतीने काँग्रेस-राष्टÑवादीविरोधात लाट आली, ही लाट कायम राहिल्यास आघाडीला अवघड जाणार आहे. विधानसभा निवडणुकीला ४ महिन्यांचा कालावधी बाकी असल्याने हिंगोली व वसमतमध्ये काँग्रेस-राष्टÑवादीच्या आमदारांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. यासाठी आतापासून व्यूहरचना करावी लागणार आहे. तर कळमनुरीत काँग्रेसला प्रबळ उमेदवार शोधावा लागणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी) राजीव सातव यांची राजकारणातील परिपक्वता लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राजीव सातव यांची राजकीय परिपक्वता दिसून आली. देशभर काँग्रेस आघाडी विरोधात वातावरण व नरेंद्र मोदी यांच्या लाटेत अनेक दिग्गज भुईसपाट झाले असताना सातव यांनी प्रचाराची आखलेली रणनिती त्यांची राजकारणातील परिपक्वता दाखविणारी होती. त्यांच्या या प्रचारात त्यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञाताई सातव यांनीही मोलाची भूमिका बजावली. महिला आघाडीची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून त्यांनी बहुतांश महिला मतदारांच्या भेटी-गाठी, कॉर्नर बैठका, जाहीर सभा घेऊन सातव यांच्या मागे मोठे मताधिक्य उभे केले. तसेच कळमनुरीचे माजी नगराध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांनी सातव यांच्या प्रचारार्थ होणार्‍या विविध नेत्यांच्या जाहीर सभांचे चांगले नियोजन करून सभा यशस्वी केल्या. सोशल मीडिया व वृत्तपत्राच्या जनसंपर्काची जबाबदारी विलास गोरे यांनी यशस्स्वीपणे सांभाळली. त्यामुळेच सातव यांचा विजय सुकर झाला. सेनेला मताधिक्य मिळाल्याने अस्वस्थता हिंगोली विधानसभेतून शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांना १० हजार ९३३ मतांचे मताधिक्य मिळाले. आ.भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या गोरेगावात वानखेडे यांना सातव यांच्यापेक्षा ६७९ मते जास्तीची मिळाली. वसमत विधानसभा मतदार संघात शिवसेनेला ९ हजार ९१ मतांची मिळाली आघाडी. आ. जयप्रकाश दांडेगावकर यांचे वर्चस्व असलेल्या अनेक गावांमध्ये शिवसेनेला मताधिक्य. शिवसेनेचे माजी आ. गजानन घुगे व डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्या गावात शिवसेनेला मताधिक्य.

Web Title: Danger hour for lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.