दररोज १४ हजार वाहनांचा राबता असलेल्या क्रांती चौक उड्डाणपुलावर धोकादायक गॅप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 02:06 PM2022-01-03T14:06:48+5:302022-01-03T14:09:32+5:30
पुलाचे पिलर्स बेअरिंग तंत्रज्ञानावर आधारित असून पुलावरील सरफेसवर गॅप एवढा मोठा आहे की, खालून पाहिले तर, वरून जाणारी वाहने त्यातून दिसतात.
- विकास राऊत
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने बांधलेला क्रांती चौकातील उड्डाणपूल निर्मितीपासूनच वादग्रस्त राहिलेला आहे. पुलाच्या बांधकामाला १० वर्षे झाली असून आता पुलावरील सरफेसवर सहा इंचांपेक्षा मोठा गॅप पडला आहे. पुलाचे पिलर्स बेअरिंग तंत्रज्ञानावर आधारित असून पुलावरील सरफेसवर गॅप एवढा मोठा आहे की, खालून पाहिले तर, वरून जाणारी वाहने त्यातून दिसतात. पुलाचे बेअरिंग अलायमेंट सरकले की, काय, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. पुलावर रोज १४ हजारांहून अधिक वाहनांचा राबता आहे.
जालना रोडवर एमएसआरडीसीने बांधलेले पाच उड्डाणपूल आहेत. सेव्हन हिल्स आणि क्रांती चौक उड्डाणपूल महापालिकेकडे हस्तांतरित झाल्याचे सांगण्यात येते. रेल्वे स्टेशनचा पूल बांधकाम विभागाने बांधलेला असून तो देखील मनपाकडे हस्तांतरित करण्यात आल्याचे सांगण्यात येते. परंतु पालिका मात्र कोणताही पूल हस्तांतरित केलेला नाही, असे ठामपणे सांगते. २ ते ६ एमएमच्या आसपास गॅप असेल, तर काही हरकत नसते; परंतु पुलावरील स्लॅबला जोडणीत पडलेला गॅप सहा इंचांच्या पुढे असल्याचे दिसत आहे.
क्रांती चौकातील उड्डाण पुलाच्या डिझाईनला २००५-०६ साली मनपाच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. त्यानंतर भूसंपादन प्रक्रिया होऊन फेब्रुवारी २००९ मध्ये पुलाचे काम सुरू झाले. किचकट डिझाईनमुळे पुलाच्या कामाला २०१० साली मुदतवाढ दिली. त्यानंतर मे २०११ मध्ये पुलाच्या अदालत रोडकडील दिशेने असलेल्या पिलर्सला तडे गेले. त्यामुळे पुलाच्या गुणवत्तेवरून मोेठे वादळ उभे राहिले. कंत्राटदाराला पुन्हा नव्याने पिलर्स उभे करावे लागले. जे पिलर्स नव्याने उभारले होते, त्याच्यावरील सरफेसमध्ये मोठा गॅप पडला असून त्याची तांत्रिक तपासणी न केल्यास मोठ्या दुर्घटनेला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाजूलाच सुरू आहे पुतळ्याचे काम
पुलाच्या मधोमध छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याची उंची वाढविण्याचे काम सुरू आहे. त्यावर दोन कोटींहून अधिक रक्कम खर्च केली जात आहे. पुतळ्याची उंची पुलाच्या सदोष डिझाईनमुळे वाढवावी लागली आहे.
कोणत्या पुलावर किती खर्च ?
सिडको बसस्थानक पूल ७२.४२ कोटी
सेव्हन हिल्स १०.७९ कोटी
मोंढा नाका २८.७० कोटी
क्रांती चौक २२.८७ कोटी
महावीर चौक ३४.९८ कोटी
संग्रामनगर २५ कोटी
एकूण सुमारे १९४.७६ कोटी
........