धोकादायक! 'ड्रग्ज'चे शेकडो फॉर्म्युले ऑनलाइन; कोणीही सहज बनवू शकतो अमली पदार्थ

By राम शिनगारे | Published: October 25, 2023 05:05 PM2023-10-25T17:05:13+5:302023-10-25T17:05:52+5:30

विद्यापीठातील तज्ज्ञांचा दावा; केमिस्ट्रीची ओळख असणाऱ्यास कोणत्याही रासायनिक प्रयोगशाळेत बनवता येऊ शकतात अमली पदार्थ

Dangerous! Hundreds of Formulas of 'Drugs' Online; Anyone can easily make drugs | धोकादायक! 'ड्रग्ज'चे शेकडो फॉर्म्युले ऑनलाइन; कोणीही सहज बनवू शकतो अमली पदार्थ

धोकादायक! 'ड्रग्ज'चे शेकडो फॉर्म्युले ऑनलाइन; कोणीही सहज बनवू शकतो अमली पदार्थ

छत्रपती संभाजीनगर : शहरासह जिल्ह्यामध्ये ४५ औषधी आणि १५ पेक्षा अधिक केमिकल बनविणाऱ्या कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्यांमध्ये लागणाऱ्या रसायनातूनच अमली पदार्थ बनविले जात असल्याचे उघडकीस आले. हे अमली पदार्थ कशा पद्धतीने बनवतात, त्याचे शेकडो फॉर्म्युले, संशोधन पेपर ऑनलाइन उपलब्ध आहेत. त्यामुळे रसायनशास्त्रातील थोडाफार अभ्यास असणारा व्यक्तीही कोणत्याही रासायनिक प्रयोगशाळेत ड्रग्ज बनवू शकतो, असा दावाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील संशोधक डॉ. बापूराव शिंगटे यांनी केला आहे.

पैठण, वाळूज एमआयडीसीतील काही केमिकल कंपन्यांमध्ये बनविलेल्या कोकेन, मेफेड्रोन, केटामाइनसह इतर अमली पदार्थांचा २५० कोटी रुपयांचा मोठा साठा गुजरातच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने पकडला. संबंधित कंपन्या केमिकल बनविणाऱ्या आहेत. या कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठी आणलेल्या रसायनातूनच प्रयोगशाळेत रासायनिक अभिक्रिया करून अमली पदार्थ बनविले आहेत. त्याविषयीची संपूर्ण माहिती ऑनलाइन उपलब्ध आहे. त्यासाठी संशोधन, अभ्यासाची गरज नसल्याचेही शिंगटे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

कोकेन : दक्षिण अमेरिकेतील 'ई कोका' नावाच्या वनस्पतीपासून कोकेन बनविण्यात येते. या रसायनाचा वापर औषधांसाठी मोठ्या प्रमाणात होतो. भूल देणे, वेदनाशामक गोळ्यांसाठी याचा वापर केला जातो. ई कोका वनस्पतीचा पाला, खोडाचा वापर करून कार्बोमिथॉक्सिट्रोपीनोन नावाचे अल्कोलाइड तयार केले जाते. त्याला शॉर्टमध्ये 'सीएमपी' म्हणतात. त्यापासून एक स्टेप केल्यानंतर 'इक्गोनाइन मिथाइल इस्टर म्हणजेच ईएमई हा घटक तयार होतो. त्यापासून कोकेन हा अमली पदार्थ बनतो. वनस्पतीपासून निघणारे हे एकमेव ड्रग आहे. याविषयीचे १०० पेक्षा अधिक पेटंट ऑनलाइन उपलब्ध आहेत.

मेफेड्रोन : या अमली पदार्थाचा औषधांसाठी वापर केला जात नाही. १०० वर्षांपासून हे रसायन बनविण्यात येते. हे तयार करण्यासाठी मिथाइल प्रोपियोफिनोनचा वापर केला जातो. मिथाइल प्रोपियोफिनोनवर रासायनिक अभिक्रिया केल्यास त्यापासून मेफेड्रोन म्हणजेच एमडी बनते. ते बनविण्यासाठी लागणारे रसायन कोणत्याही प्रकारच्या प्रयोगशाळेत सहजपणे तयार केले जाऊ शकते. याचा केवळ नशेसाठी वापर होतो.

किटामाइन : किटामाइन हे मेडिसिन असून, त्याची निर्मिती प्रयोगशाळेत करता येते. किटोन नावाच्या रसायनावर अभिक्रिया केल्यानंतर सहजपणे किटामाइन तयार होते. हे रसायन बनविण्याचे फाॅर्म्युले विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. हे ड्रग्ज कोकेन, ॲम्फीटामाइनसोबत दिल्यास त्याची तीव्रता वाढते.

Web Title: Dangerous! Hundreds of Formulas of 'Drugs' Online; Anyone can easily make drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.