मुकुंदवाडी ते क्रांती चौकात रात्रीचा प्रवास धोक्याचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:03 AM2021-09-13T04:03:32+5:302021-09-13T04:03:32+5:30
कुत्र्यांच्या झुंडींनी घेतला रस्त्याचा ताबा ! औरंगाबाद : रात्रीच्यावेळी क्रांती चाैक, मुकुंदवाडीसह शहरातील विविध चौकातून जाताना अत्यंत सावधपणे प्रवास ...
कुत्र्यांच्या झुंडींनी घेतला रस्त्याचा ताबा !
औरंगाबाद : रात्रीच्यावेळी क्रांती चाैक, मुकुंदवाडीसह शहरातील विविध चौकातून जाताना अत्यंत सावधपणे प्रवास करावा लागतो. मोकाट कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी रस्त्यावरील वाहनधारक व पादचाऱ्यांवर धावून जातात. कुत्रा चावण्याच्या भितीने अपघाताचे प्रकार वाढले आहे. मनपाकडून कॉलनी व वसाहतीतील मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करून पुन्हा त्यांना जेथून पकडून आणले, त्याच ठिकाणी सोडले जाते. त्यामुळे कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून वाहनचालकांसाठी ती डोकेदुखी ठरली आहे.
आम्हाला चोरांची नाही, कुत्र्याची भीती वाटते
- कामावरून घरी जाताना मुकुंदवाडी चौकात कुत्र्यांची मोठी झुंड बसलेली असते. चोराला आम्ही घाबरत नाहीत; परंतु कुत्र्यांचे चावणे गंभीर आहे. औद्योगिक क्षेत्रात प्रमुख रस्त्यावर विविध ठिकाणी त्यांनी रस्त्याचा ताबा घेतला आहे.
- सुनील भुईगड (नागरिक)
- मोकाट कुत्रे धावून आल्यामुळे वाहन घसरून अपघातात झाला. त्यामुळे दीड महिन्यापासून मी घरीच आहे. वाहनाच्या पुढे-मागे कुत्रे धावत असतात. स्वत:ला वाचविण्यासाठी वाहन घसरून पडल्याने दुखापत झालेली आहे. मोकाट कुत्र्यांचा मनपाने बंदोबस्त करावा.
- संदीप मगरे (नागरिक)
या चौकात सांभाळून
रेल्वेस्टेशन, संग्रामनगर, देवळाई, क्रांती चौक, मुकुंदवाडी, चिकलठाणा, हर्सुल, सेंट्रलनाका चौकातून जाताना सावधपणे वाहन चालविणे गरजेचे आहे.
कुत्र्याच्या नसबंदी
- नुकतेच शहरात मनपाच्या वतीने जवळपास ६१०० मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले आहे.
- रस्त्यावर चौकाचौकांत कुत्र्यांचे टोळके फिरताना दिसत आहेत. कुत्र्यांसह लहान पिल्लेही दिसत असून, कुणी पिल्लांना हात लावल्यास कुत्रे अधिक क्रोधीत होतात. त्यामुळे श्वान दंशाचे प्रकार वाढले आहेत.
कुत्रा कोणत्या प्रकारे चावला आहे
कुत्रा कधी कुठे चावला. गंभीर स्वरूपाचे दात लागलेत की लचके तोडले. तो कुत्रा पाळीव आहे की भटका. त्यानुसार उपचारपद्धती ठरते. त्यावर पशुवैद्यकीय अधिकारीच अधिक भाष्य करू शकतात.
- मोकाट कुत्र्यांना पकडणे, त्यांची नसबंदी करून त्यास त्याच्या पूर्वीच्याच अधिवासात आणून सोडावे लागत आहे. त्यासाठी वन्यजीव विभागाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करावे लागते. दररोज परिसरात ३० ते ४० कुत्रे पकडले जातात.
- शेख शाहेद ( प्रभारी मुख्य पशुसंवर्धन अधिकारी, मनपा विभाग)