खोजेवाडी फाट्यावरील धोकादायक झाडे तोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 08:43 PM2019-07-21T20:43:28+5:302019-07-21T20:43:59+5:30
मुंबई-नागपूर महामार्गावरील खोजेवाडी फाटा येथे शनिवारी धोकादायक झाडे जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आली.
वाळूज महानगर : वाढत्या अपघाताच्या घटना रोखण्यासाठी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी पुढाकार घेतला असून, अपघातग्रस्त ठिकाणची धोकादायक झाडे तोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई-नागपूर महामार्गावरील खोजेवाडी फाटा येथे शनिवारी धोकादायक झाडे जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आली.
मुंबई-नागपूर महामार्गावर अवजड व इतर वाहनाची वर्दळ असते. त्यातच हा रस्ता शिर्डीकडे जाणारा असल्याने साई भक्तांचीही गर्दी असते. या मार्गावरील खोजेवाडी फाटा येथे वळण रस्त्यावर दोन्ही बाजूला मोठ मोठी झाडे आहेत.
समोरुन येणारी वाहने दिसत नसल्याने अपघाताच्या घटना वाढल्या होत्या. यात अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर वाळूज एमआयडीसी पोलिसांनी धोकादायक झाडे तोडण्याचा निर्णय घेतला. तहसीलदार यांची रितसर परवानगी घेवून शनिवारी सकाळी खोजेवाडी फाटा येथे जाऊन जेसीबीच्या सहाय्याने वळण रस्त्याच्या दोन्ही बाजूची धोकादायक झाडे तोडण्यात आली.