दंगल : राजेंद्र जंजाळ, फेरोज खान अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 01:19 AM2018-05-16T01:19:26+5:302018-05-16T01:19:43+5:30

परवाच्या दंगलीप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ आणि एमआयएमचे नगरसेवक फिरोज खान या दोघांना अटक केली. दोघांनाही १८ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

Dangle: Rajendra Janjal, Feroze Khan arrested | दंगल : राजेंद्र जंजाळ, फेरोज खान अटकेत

दंगल : राजेंद्र जंजाळ, फेरोज खान अटकेत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : परवाच्या दंगलीप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ आणि एमआयएमचे नगरसेवक फिरोज खान या दोघांना अटक केली. दोघांनाही १८ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
शहरातील राजाबाजार, नवाबपुरा, शहागंज, चेलीपुरा, मोतीकारंजा, गांधीनगर भागात ११ व १२ मे रोजी भीषण दंगल झाली होती. यात सहभागी असणाऱ्यांविरोधात पोलिसांनी दंगलीचे गुन्हे दाखल केले आहेत.
जंजाळ यांच्याविरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सकाळी १०.३० वाजता शिवाजीनगर परिसरातून जंजाळ यांना अटक केली. त्यावेळी शिवाजीनगरात तणाव निर्माण झाला होता. सकाळी जंजाळ यांना अटक करण्यासाठी विशेष पोलीस पथकाचे निरीक्षक नवले शिवाजीनगरात दाखल झाले होते. नागरिकांची गर्दी लक्षात आल्याने चौकशीसाठी तुम्हाला क्रांतीचौक ठाण्यात यावे लागेल, असे सांगितले. जंजाळ हे स्वत:च्या गाडीतून अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल यांच्यासह ठाण्यात हजर झाले; परंतु क्रांतीचौक ठाण्यात शिवसैनिकांची मोठी गर्दी जमली होती. फिर्यादी मोहंमद शोएब अब्दुल मुनाफ (२८, रा. राजाबाजार) यांचे दुकान व वाहनांना आग लावून लुटमार केल्याची व लाखोंचे नुकसान केल्याची तक्रार दाखल झाली आहे. या तक्रारीत गाड्या व दुकानांच्या जाळपोळीत ४२ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांना घटनास्थळी सापडलेले पुरावे आणि व्हिडिओत जाळपोळ करताना दिसणारी व्यक्ती ही जंजाळ असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्यांच्या विरोधात मालमत्तेचे नुकसान, दंगलीत सहभाग आदी कलमान्वये रविवारी (दि.१३) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात सर्व पुरावे हाती आल्यानंतर पोलिसांनी जंजाळ यांना मंगळवारी अटक केल्याचे ‘एसआयटी’ पथकातील अधिका-यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी जंजाळ यांना कागदपत्रांसह न्यायालयात हजर केले. गुन्हा घडताना दंगल झालेली असून, अटक आरोपीने घरे, मोटारसायकली व चारचाकी वाहनांची तोडफोड करून त्या जाळून टाकल्या, याबाबत नेमका काय उद्देश होता, वाहने जाळण्यासाठी व तोडफोड करण्यासाठी ज्या हत्यारांचा वापर केला, गाड्या जाळण्यासाठी ज्या साहित्याचा वापर केला ते जप्त करणे बाकी आहे, गुन्हा करतानाचे आरोपीच्या अंगावरील कपडे जप्त करणे आहे, फरार साथीदार आरोपींना अटक करणे आहे, दंगल घडवून समाजात अशांतता निर्माण केली असून, यामागे कोण आहे, याचा तपास करायचा आहे, म्हणून आरोपीस पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील मनीषा गंडले यांनी केली. यावेळी न्यायालयाने जंजाळ यांना १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तणाव
शिवाजीनगर येथील घरातून राजेंद्र जंजाळ यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना जिन्सी पोलीस ठाण्यात न नेता क्रांतीचौक पोलीस ठाण्यात आणले. तेव्हा जंजाळ यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. शिवसेनेचे पदाधिकारी प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले, भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, माजी महापौर बापू घडामोडे, उपमहापौर विजय औताडे, नगरसेवक राजू शिंदे, संजय केणेकर आदी यावेळी उपस्थित होते. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार करण्याचा इशारा दिल्यानंतर जमावाने पोलीस ठाण्याचा परिसर रिकामा केला.
जंजाळ यांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबत समर्थकांनी हुल्लडबाजी केली. गर्दी वाढल्याने पोलिसांनीच अखेर जंजाळ यांना तुम्ही स्वत:हून क्रांतीचौक पोलीस ठाण्यात या, असे सांगितले. त्यावर जंजाळ काही समर्थकांसह ठाण्यात दाखल झाले. यावेळी उपायुक्त राहुल श्रीरामे, सहायक पोलीस आयुक्त ज्ञानोबा मुंडे, वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सी.डी. शेवगण तसेच शहरातील विविध ठाण्यांचे निरीक्षक, फौजदार आणि विशेष पोलीस शस्त्रासह पथक, दंगा काबू व्हॅनदेखील क्रांतीचौक पोलीस ठाण्यात हजर होते. दरम्यानच्या काळात शिवाजीनगरातील नागरिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून क्रांतीचौक पोलीस ठाणे गाठले. परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून राखीव दलाच्या तीन गाड्या व पोलीस कर्मचा-यांनी शिवाजीनगरला वेढा घातला होता. हडको, टीव्ही सेंटर चौकात देखील शिवसैनिकांनी दुकाने बंद ठेवून जंजाळ यांच्या अटकेचा निषेध केला.
आधी फरार; नंतर शरण
शहरात शुक्रवारी रात्री उसळलेल्या दंगलप्रकरणी मंगळवारी सकाळी एमआयएमचे विरोधी पक्षनेते फेरोज खान यांना अटक करण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा नवाबपुरा येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचला. त्यापूर्वीच फेरोज खान फरार झाले होते. दिवसभरातील नाट्यमय घडामोडीनंतर सायंकाळी ६.३० वाजता आ. इम्तियाज जलील यांनी त्यांना सिटीचौैक पोलीस ठाण्यात हजर केले. पोलिसांनी विरोधी पक्षनेत्यास अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांच्या या अटक सत्रानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
 

Web Title: Dangle: Rajendra Janjal, Feroze Khan arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.