दानिशचे मारेकरी म्हणतात, जखमींनीच आणला होता चाकू आम्हाला मारायला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 07:25 PM2021-03-12T19:25:46+5:302021-03-12T19:26:27+5:30
दृश्यम सिनेमासारखे सर्व जण एकसारखीच उत्तरे देत आहेत. जखमी असलेल्या तरुणांनी हा चाकू आणला? होता. तेच आपल्यावर हल्ला करणार होते.
औरंगाबाद : दानिशचा खून करण्यासाठी वापरलेला धारदार चाकू आरोपी नितीन ऊर्फ गब्या भास्कर खंडागळे आणि त्याच्या नातेवाईकांनी गायब केला आहे. जखमींनी आम्हाला मारण्यासाठी चाकू आणला होता. त्यांच्या हातातील चाकू आम्ही हिसकावून घेतला, असा पवित्रा आरोपींनी घेतला असून, एखाद्या सिनेमातील दृश्याप्रमाणे सर्व आरोपी पोलिसांना सारखीच माहिती देत आहेत.
अंगुरीबाग येथे मंगळवारी मध्यरात्री सय्यद दानिशोयोदीन सय्यद शफियोद्दीन या २१ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. त्याच्याच कॉलनीतील तीन जणांना आरोपींनी चाकूहल्ला करून जखमी केले होते. क्रांतीचौक पोलिसांनी आरोपी नितीन ऊर्फ गब्या भास्कर खंडागळे, सोमनाथ खंडागळे, आई रत्नमाला आणि बहिणी ॲड. दीपालीविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली. आरोपी, मृत आणि अन्य जखमींच्या अंगावरील रक्ताने माखलेले कपडे पोलिसांनी पंचासमक्ष जप्त केले. पोलिसांनी गुरुवारी त्यांची कसून चौकशी करीत घटनेचे खरे कारण शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही काहीच माहिती देत नसल्याचे पोलीस निरीक्षक डॉ. जी. एच. दराडे यांनी सांगितले.
डॉ. दराडे म्हणाले की, आम्ही घटना घडल्यापासून तपास सुरू केला होता. आरोपी नितीन ऊर्फ गब्याने चौघांवर चाकूहल्ला करण्यासाठी चाकू कुठून आणला? खून केल्यावर त्याने चाकू कुठे लपवून ठेवला? याविषयी आरोपींकडे चौकशी केली. परंतु, ते याविषयी काहीच सांगत नाहीत. दृश्यम सिनेमासारखे सर्व जण एकसारखीच उत्तरे देत आहेत. जखमी असलेल्या तरुणांनी हा चाकू आणला? होता. तेच आपल्यावर हल्ला करणार होते. तत्पूर्वीच चाकू हिसकावून घेत त्यांना मारल्याचे ते सांगतात. मात्र, चाकू कुठे लपविला या प्रश्नाचे उत्तर माहिती नाही, असे एकसारखे सर्वच देत आहेत. यामुळे गुरुवारी दिवसभरात त्यांच्याकडून पोलिसांना चाकू जप्त करता आले नाही.
आरोपी नितीन ऊर्फ गब्या मनोरुग्ण आहे. त्याला मेंदूचा झटका येतो, असे आरोपींनी पोलिसांना सांगितले. यामुळे पोलिसांनी काल अटक केल्यावर तातडीने त्याची सर्वसाधारण वैद्यकीय तपासणी केली. आज पुन्हा त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.