औरंगाबादच्या सीए विद्यार्थ्यांचा देशात डंका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:03 AM2018-02-17T00:03:46+5:302018-02-17T00:03:52+5:30
सीए विद्यार्थी संघटनेच्या १८० शाखा देशभरात कार्यरत आहेत. या सर्व शाखांमधून औरंगाबादेतील सीए विद्यार्थी संघटनेने दिल्ली गाजविली. खुद्द केंद्रीय राज्यमंत्री पी.पी. चौधरी व आयसीएआय संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सीए नीलेश विकमसे यांनी संघटनेच्या कार्याचा गौरव करीत द्वितीय पुरस्कार प्रदान केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सीए विद्यार्थी संघटनेच्या १८० शाखा देशभरात कार्यरत आहेत. या सर्व शाखांमधून औरंगाबादेतील सीए विद्यार्थी संघटनेने दिल्ली गाजविली. खुद्द केंद्रीय राज्यमंत्री पी.पी. चौधरी व आयसीएआय संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सीए नीलेश विकमसे यांनी संघटनेच्या कार्याचा गौरव करीत द्वितीय पुरस्कार प्रदान केला. उल्लेखनीय म्हणजे पश्चिम विभागातील तीन राज्यांतून सर्वोत्कृष्ट शाखेचा बहुमान या एकाच सीए विद्यार्थी संघटनेला मिळाला.
आयसीएआय संघटनेच्या वतीने दिल्लीत आयोजित शानदार सोहळ्यास केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती. भिलाई येथील सीए विद्यार्थी संघटना देशभरातील सीए विद्यार्थी संघटनेमधून नंबर वन ठरली. त्यांनी ६ हजार आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये सीएच्या अभ्यासक्रमाबद्दल जागृती निर्माण केली.
औरंगाबादेतील सीए संघटनेने वर्षभरात विविध उपक्रम राबविले. यात जीएसटी, रेरा, ई-वे बिल यासंदर्भात जनजागृती कार्यक्रम घेतलेच, शिवाय गुरुपौर्णिमा उत्सव व शहीद जवानांच्या परिवाराला सन्मानित केले व आर्थिक मदत दिली. तसेच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा विश्वासही त्यांना दिला. विद्यार्थी संघटनेने वार्षिक परिषदही एक योद्धा म्हणून गाजविली.
सीए विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सीए रोहन आचलिया, उपाध्यक्ष ऐश्वर्या ब्रह्मेचा व सचिव रोहन खंडेलवाल यांनी पुरस्कार स्वीकारला. महाराष्ट्र, गोवा व गुजरात या पश्चिम विभागातील तीनही राज्यांत मिळून या एकाच संघटनेला पुरस्कार मिळला.
औरंगाबाद सीए संघटनेचे अध्यक्ष सीए अल्केश रावका व सर्व पदाधिकाºयांचे विद्यार्थी संघटनेला मोलाचे मार्गदर्शन लाभले. हा शहरातील सर्व सीए विद्यार्थी व सीएंचा विजय आहे, असे प्रतिपादन सीए रोहन आचलिया यांनी व्यक्त केले.
यावेळी संघटनेचे अभिनव शर्मा, मंजिरी महतोले, श्रेया लड्डा, रोहन मुगदिया, राशी तोतला यांनी वर्षभर परिश्रम घेतले.