यूपीएससीत मराठवाड्याचा डंका ! ८० हून अधिक मराठी चेहऱ्यांत १५ मराठवाड्यातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 05:25 PM2020-08-05T17:25:32+5:302020-08-05T17:31:26+5:30

बीड जिल्ह्यातील ६, नांदेड ३, जालना २, परभणी १, औरंगाबाद १, लातूर १, उस्मानाबाद १ जण यशस्वी

Danka of Marathwada in UPSC ! 15 out of more than 80 Marathi faces from Marathwada | यूपीएससीत मराठवाड्याचा डंका ! ८० हून अधिक मराठी चेहऱ्यांत १५ मराठवाड्यातील

यूपीएससीत मराठवाड्याचा डंका ! ८० हून अधिक मराठी चेहऱ्यांत १५ मराठवाड्यातील

googlenewsNext
ठळक मुद्देयूपीएससी निकालात महाराष्ट्राचा टक्का वाढला उज्ज्वल यशाची परंपरा कायम 

औरंगाबाद : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातील ८० हून अधिक विद्यार्थ्यांनी यश मिळविले असून, यात मराठवाड्यातील १५ जणांचा समावेश आहे. नेहा भोसले हिने देशात १५ वा, बीड येथील मंदार पत्की याने २२ वा, नांदेडच्या योगेश पाटील याने ६३ वा, तर सोलापूरमधील राहुल चव्हाण याने १०९ वा क्रमांक मिळविला आहे. विशेष म्हणजे, सोलापूर जिल्ह्यातील आठ जणांनी यशाचा झेंडा रोवला आहे. 

देशात ८२९ उमेदवारांनी यश संपादन केले. प्रदीप सिंह याने देशात प्रथम, जतीन किशोर याने द्वितीय, तर प्रतिभा वर्मा हिने तृतीय क्रमांक पटकावला. खुल्या संवर्गातील ३०४, आर्थिक दुर्बल घटकातील ७८, इतर मागासवर्गीय संवर्गातील २५१, अनुसूचित जाती संवर्गातील १२९ आणि अनुसूचित जमाती संवर्गातील ६७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेत मराठवाड्यातील १५ जणांनी यशोशिखर गाठले आहे. यात बीड जिल्ह्यातील ६, नांदेड ३, जालना २, परभणी १, औरंगाबाद १, लातूर १, उस्मानाबाद १ जणाचा समावेश आहे, यात बीडचे मंदार पत्की यांनी राज्यात दुसरा, तर देशात २२ वा क्रमांक पटकावला आहे. ध्येय, दिशा निश्चित करून अभ्यासाचे अतिसूक्ष्म नियोजन केल्यास हमखास यश प्राप्त होते, अशा शब्दात युपीएससी परीक्षेत देशात २२ वा आणि राज्यात दुसरा आलेल्या मंदार पत्की यांनी यशाचे गमक सांगितले. 

अंबाजोगाईच्या वैभव वाघमारे यांनी या परीक्षेत ७७१ वा क्रमांक पटकावला. बीड जिल्ह्यातील श्रेणिक दिलीप लोढा हे २२१ वे आले आहेत. २०१८ मध्ये लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांना १३३ वा रॅँक मिळून आयपीएस केडर मिळाले. सध्या नाशिक येथे प्रशिक्षण सुरु असून २० आॅगस्टनंतर अमरावती येथे सहायक पोलीस अधीक्षक म्हणून ते रुजू होणार आहेत. ओबीसी प्रवर्गातून बीड येथील प्रसन्ना रामेश्वरसिंग लोध यांनी ५२४ वा रॅँक मिळविला. बारावीच्या सीईटी परीक्षेत त्यांनी तिसरा क्रमांक पटकावला होता.  बीड येथील जयंत किशोर मंकले यांनी दिव्यांगांतून १४३ वा रॅँक पटकावला आहे. केज तालुक्यातील आडस येथील नेहा किर्दक यांनी ३८३ वा रॅँक मिळविला. त्या एमबीबीएस झालेल्या असून सध्या कुटुंबियांसह औरंगाबादेत वास्तव्यात आहेत.

नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील नागणीचे आकाश विनायक आगळे हे ३१३ व्या क्रमांकावर आहेत़ कंधार तालुक्यातील मौजे दिग्रस येथील माधव विठ्ठल गिते यांना २१० वी रँक मिळाली आहे़ अल्पभूधारक असलेल्या शेतकरी कुटुंबातून ते आले आहेत़ नायगाव तालुक्यातील शेळगाव (गौरी) येथील योगेश अशोक बावणे (पाटील) यांना दुसऱ्याच प्रयत्नात ६३ वा रँक मिळाला आहे़ 
उस्मानाबाद जिल्ह्यातील एकुरगा येथील असित नामदेव कांबळे यांनी ६५१ वा रँक मिळविला आहे. यावर्षीच मार्च महिन्यात त्यांनी भारतीय वनसेवा परीक्षेत ६६ वा क्रमांक पटकाविला होता. त्यांचे वडील नामदेव कांबळे हे राज्य परिवहन महामंडळ उमरगा येथे मेकॅनिक म्हणून निवृत्त झाले आहेत. 

युपीएससी हा प्रशासकीय सेवेत रूजू होण्याचा राजमार्ग आहे, अशी प्रतिक्रिया ७५२ व्या रँकवर आलेल्या लातूरच्या नीलेश गायकवाड यांनी व्यक्त केली. त्यांनी आयआयटी मुंबई येथून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक. आणि एम.टेक या पदव्या प्राप्त केल्या.
औरंगाबादचे सुमीत राजेश महाजन हे २१४ वे आले आहेत. जालना जिल्ह्यात जाफराबाद तालुक्यातील वरूड (बु.) येथील अभिजित जिनचंद्र वायकोस यांना ५९० रँक मिळाली आहे. जाफराबाद तालुक्यातीलच बेलोरा येथील अक्षय दिनकर भोसले यांना ७०४ रँक मिळाली आहे. परभणी येथील कुणाल मोतीराम चव्हाण यांनी २११ वा रँक मिळवित यश संपादन केले आहे. ते बी. टेक. झालेले आहेत. गेल्या काही वर्षांपासून यूपीएससी निकालात महाराष्ट्राचा टक्का वाढला असून यंदाही निकालाची परंपरा कायम आहे. मंदार पत्की याने पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले. पुण्यातील दिव्यांग विद्यार्थी जयंत मंकले यादीत चमकला आहे. 

Web Title: Danka of Marathwada in UPSC ! 15 out of more than 80 Marathi faces from Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.