दानवे, खैरे माझ्यापेक्षा दहापट वेडे : हर्षवर्धन जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 07:10 PM2020-06-20T19:10:21+5:302020-06-20T19:11:03+5:30
जाधव यांनी आज तिसरा व्हिडिओ प्रसारित करून सासरे आणि जावयामधील वादात खैरे यांना ओढले आहे.
औरंगाबाद : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे या दोघांनी मला वेडे ठरविण्याचा विडा उचलला आहे. त्यांनी माझ्या विरोधात षड्यंत्र रचले असून, मला वेडे सिद्ध करण्यासाठी ते प्रयत्न करीत असल्याचे माझ्या कानावर आले आहे; परंतु माझ्याऐवजी माझे सासरे राज्यमंत्री दानवे आणि खैरे हेच दहापट वेडे असल्याची टीका माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सोशल मीडियातून शुक्रवारी जारी एका व्हिडिओमध्ये केली आहे.
जाधव यांनी आज तिसरा व्हिडिओ प्रसारित करून सासरे आणि जावयामधील वादात खैरे यांना ओढले आहे. या व्हिडिओत जाधव म्हणत आहेत की, एखाद्याला वेडसर म्हणणे, म्हणजे त्याला डोके नसणे, असा त्याचा अर्थ होतो. मला वेडसर म्हणण्यापूर्वी दानवे आणि खैरे यांच्याकडे पाहिले, तर ते माझ्यापेक्षा दहापट वेडे असल्याचे लक्षात येईल. मुंबईला जातो म्हणून सांगायचे आणि औरंगाबादला गाडी फिरवायची, असा चकवा ते देतात. हा वेडेपणा नाही, तर काय आहे, असेही ते म्हणाले.
खैरेंबाबत तर बोलायलाच नको. मंत्र जपून कोरोना जातो, असा प्रचार करीत ते सुटले आहेत. मग सांगा वेडे कोण, मी का ते. मुख्यमंत्र्यांना सांगावे त्यांना मंत्राचे आवाहन करायला. पोलीस, आरोग्य यंत्रणेवर पडलेला ताण तरी कमी होईल. त्यांचे हाल होणार नाहीत. सकाळी ६ वाजता सरकारचा शपथविधी होतो, म्हणजे हा डोके असण्याचा भाग आहे? की वेडसरपणा.
सकाळी राष्ट्रवादीसोबत भाजप जाते, नंतर सरकार पडले की, पुन्हा विरोधात बोलणे सुरू होते. हा वेडेपणा नाही तर काय आहे? शिवसेनेने आयुष्यभर काँगेसला शिव्या घातल्या आणि आता त्यांच्यासोबत सत्तेत बसली आहे, हा वेडेपणा नाही काय? लोक वेडे नाहीत; परंतु तुम्ही निवडून आल्यावर वेडेपणा केल्याचेही जाधव म्हणाले.
दरम्यान, याप्रकरणी दानवे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. खैरे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, या प्रकरणात मला काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही.